● प्रख्यात डॉ. डी. डी. टन्ना यांच्याहस्ते सन्मान
वणी | अस्थिरोग शल्यचिकित्सक तज्ज्ञ डॉ. अजित फडके ” नाम ही काफी है ” संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रख्यात आहेत. नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीने मुंबईतील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. डी. डी. टन्ना यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी त्यांना शाल, श्रीफळ व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अस्थिरोग शल्यचिकित्सेत पारंगत असलेले डॉ. अजित फडके हे या क्षेत्रातील ’दिग्गज’ म्हणूनच ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे, त्यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. गेल्या चार दशकांपासून अस्थिरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी कठीण यशस्वी शस्त्रक्रिया करून आपले नाव ‘ऑर्थोपेडिक’ क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीने त्यांना ’जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मकरंद धोपावकर, सचिव डॉ. निनाद गोडघाटे, उपाध्यक्ष डॉ. सत्यजित जगताप तसेच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गडगोणे (चंद्रपूर) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित कार्यक्रमाला विदर्भातील सुमारे साडेतीनशे अस्थिरोग तज्ज्ञांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी नागपूर येथील ज्येष्ठ अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. सुधीर बाभूळकर, डॉ. सक्सेना, डॉ. गोल्हर आदींनी डॉ. फडके यांचे अभिनंदन केले.
● सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर ●
डॉ. अजित फडके यांनी विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांमध्ये विविध जबाबदार्या पार पाडल्या आहेत. ते ’आयएमए’ यवतमाळचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटी व विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष होते. संजीवन सेवा व संशोधन संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच ते रोटरीचेही सदस्य आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी पोलिओ शस्त्रक्रिया शिबिरे घेतली आहेत. त्यांना ’आयटी’ सन्मानाने सुध्दा गौरविले आहे. महात्मा गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सेवाग्राम (वर्धा) येथे दर शनिवारी ते ऑर्थोप्लास्टी सर्जरीसाठी जातात.
वणी : बातमीदार