● जेष्ठ पत्रकारांनी केले मोलाचे मार्गदर्शन
रोखठोक | स्माईल फाऊंडेशन व वणी बहुगुणी न्युज पोर्टलतर्फे येथील वसंत जिनिंग सभागृहात आयोजित एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यासह पांढरकवडा व चंद्रपूर येथील सुमारे 60 शिबिरार्थी सहभागी झाले होते. जेष्ठ पत्रकारांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर नवोदितांनी उत्साही सहभाग नोंदवला.
येथील वसंत जिनिंग सभागृहात आयोजित एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे होते. दोन सत्रात आयोजित या कार्यशाळेत यवतमाळ येथील ज्येष्ठ पत्रकार अंकुश वाकडे, दिनेश गंधे, चंद्रपूर येथील डिजिटल मीडिया तज्ज्ञ देवनाथ गंडाटे यांच्यासह, श्रीवल्लभ सरमोकदम, जब्बार चीनी, जितेंद्र कोठारी, निकेश जिलठे यांनी उपस्थित शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रा. दिलिप अलोणे, वसंत जिनिंगचे संचालक प्रकाश म्याकलवार, घनश्याम निखाडे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर देवानंद साखरकर, डॉ. महेंद्र लोढा, पत्रकार संतोष कुंडकर, प्रेस वेलफेअर असोशियसनचे तुषार अतकरे, दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष जब्बार चिनी, जागृत पत्रकार संघटनाचे संदीप बेसरकर, न्यूज मीडिया असोशियसनचे दीपक छाजेड, पत्रकार सुनील पाटील, परशुराम पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटक म्हणून बोलताना माजी आमदार वामनराव कासावार यांनी देशातील आजची पत्रकारिता यावर भाष्य करत आजच्या काळात पत्रकारांनी नि:पक्ष पत्रकारिता करून लोकशाही मजबूत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आशिष खुलसंगे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पत्रकारिता करावी असे सुचवले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात निकेश जिलठे यांनी पत्रकारितेची ओळख व बातमी लेखन या विषयावर तर श्रीवल्लभ सरमोकदम यांनी बातमीतील भाषा, न्यूज ऍन्गल या विषयावर मार्गदर्शन केले. शोध पत्रकारिता या विषयावर जब्बार चीनी यांनी मार्गदर्शन केले.
दुस-या सत्रात दिनेश गंधे यांनी गेल्या 30 वर्षांत पत्रकारितेत होणारे बदल, बातमी करताना येणारी विविध आव्हाने या विषयावर खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. तर अंकुश वाकडे यांनी जगभरातील पत्रकारितेचा थोडक्यात आढावा घेत बातमीचा सोर्स, व्यावसायिक पत्रकारिता यावर भाष्य केले. देवनाथ गंडाटे यांनी डिजिटल मीडियाचे आजचे स्वरूप व त्यासाठी उपयोगात येणारे विविध टुल्स याची माहिती शिबिरार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन सागर जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र कोठारी यांनी केले. उपस्थितांचे आभार तन्मय कापसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल डफ, अभिलाष राजूरकर यांच्यासह स्माईल फाउंडेशनचे पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, अनिकेत वासरिकर, रोहित ओझा, कुणाल आत्राम, प्रेम बावणे, रुद्राक्ष, कनाके, राज भरटकर, मनीष मिलमिले, आकाश राजूरकर, घनश्याम हेपट यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार