● मराठी भाषिक प्रतिनिधी नियुक्त करा
Wani News | विमा कंपनीकडून अनेक गावात पंचनामे व सर्व्हेक्षण ही करण्यात आले नाही. अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. मारेगाव येथील रिलायन्स पिक विमा कंपनी कार्यालयातील विमा प्रतिनिधी यांना मराठी भाषा नीट येत नसल्यामुळे शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यास अडचण होत आहे. यामुळे मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. Panchnama and survey were not done in many villages by the insurance company.
खरीप हंगामात झालेल्या पूर परिस्थितीमुळे वणी, मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या हेतूने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते. चालू वर्षापासून तर अवघ्या एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली.
या योजनेत अधिसूचित पिकांना पेरणीपासून पिकांच्या काढणीपश्चातही विमासंरक्षण आहे. खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट नोंद झाली आहे. मात्र संबंधित विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप विमा रक्कम देण्यात आली नाही.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मनसे नेते राजू उंबरकर यांनी मारेगाव येथे रिलायन्स पिक विमा कंपनीला भेट दिली. यावेळी कार्यालयातील विमा प्रतिनिधी हे कृषी पदवीधर नव्हते तर त्यांना मराठी भाषा सुध्दा नीट येत नव्हती. यामुळे शेतकाऱ्यांसोबत संवाद साधण्यास अडचण होत असल्याचे निदर्शनास येताच उंबरकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून खडसावले व त्वरित कृषी पदवीधर व मराठी भाषिक प्रतिनिधी नियुक्त करावा ही मागणी लावून धरली.
तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पुन्हा पंचनामे व सर्वेक्षण करावे या दरम्यान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ह्यांचा विभागीय दौरा आयोजित करण्याचे निर्देश द्यावे. तसेच येत्या आठ दिवसात सदर समस्येवर तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुक्याच्या वतीने विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. याप्रसंगी होणाऱ्या सर्व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल.
राजू उंबरकर, मनसे नेते
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले तसेच तातडीने सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून दयावा अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News