वणी बातमीदार:
अपघाताला निमंत्रण, विज वितरणाची मुजोरी
PWD आक्रमक, तो खांब काढा अन्यथा कारवाई
वणी शहरातील साई मंदिर ते चिखलगाव राज्य मार्गाचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर अगदी मधोमध वीज वितरणाचा वीज पुरवठा करणारा खांब उभा आहे. तो काढावा याकरिता बांधकाम विभागाने अनेकवेळा पत्रव्यवहार केला मात्र संबंधित विभाग मानायला तयार नाही. चक्क… राज्यमार्गावर मध्यभागी विजेचा खांब असल्याने आपसूकच अपघाताला निमंत्रण मिळणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक झाला आहे. तात्काळ तो अनधिकृत खांब काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा गर्भित इशारा पत्रातून दिला आहे.
गुरुवारी बांधकाम विभागाने वीज वितरण कंपनी ला पत्र पाठवले तसेच मंत्रालयातील सचिवांना अवगत केले असून अद्याप वीज वितरणने ठोस पावले उचलली नाहीत. शहरात साईबाबा मंदिर ते चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूने अर्धेअधिक काम पूर्ण झाले आहे. आता नव्याने तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या अगदी मधोमध विजेचे खांब आले आहे. तसेच त्या विद्युत वहिनीच्या तारा ही रस्त्यापासून केवळ सात ते आठ फूट उंचीवर आहेत. तो खांब भविष्यात मोठया अपघाताला कारणीभूत ठरणार आहे.
वणी ते यवतमाळ हा रस्ता राज्यमार्ग आहे. या रस्त्यावर विद्युत वाहिन्यांचे काम रस्त्याच्या मध्यापासून 14 ते 15 मीटर अंतरावर करणे अपेक्षित आहे. परंतु या रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता वीज वितरण कंपनी ने अधेमधे व आपल्या सोयीने वीज खांबांची उभारणी केली आहे. तसेच त्या खांबाला काढण्यात यावे याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने वीज वितरणला अवगत केले. मात्र ते तुघलकी आव आणत विशिष्ट रकमेची पूर्तता करावी तरच तो खांब काढण्यात येईल असे स्पष्ट केल्यामुळे बांधकाम विभागाने नियमावर बोट ठेऊन आक्रमक पवित्रा घेतला आहे. तो खांब निघणार की जैसे थे राहणार याकडे वाणीकरांचे लक्ष लागले आहे.
तात्काळ तो खांब हटवा अन्यथा…
साई मंदिर ते चिखलगाव मार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य मार्गावर मधोमध विद्युत खांब आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास येत असून अद्याप वीज वितरणने तो खांब काढला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता खांब लावण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. रस्त्यावर विनापरवानगी उभे केलेले विद्युत खांब हे वीज वितरण ने स्वखर्चाने रस्त्याच्या सीमेवर नियमानुसार हलवावेत अन्यथा कारवाई अटळ आहे
तुषार परळीकर
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी