*त्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करा..

*संजय निखाडे यांची मागणी
वणी बातमीदार: शासनाच्या नियमाला तिलांजली देत ACC गोवारी माईन्स मध्ये गुरुवारी सायंकाळी अवैध “ब्लास्टिंग” करण्यात आली. सदर वर्तन नियमबाह्य असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी उप विभागीय अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
शिंदोला परिसरातील ACC गोवारी माईन्स येथे सतत होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे गोवारी गावातीत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील घरांना तडे गेलेले आहेत. त्याप्रमाणेच ACC गोवारी माईन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन चालू आहे. शासनाच्या महसूलचे गबन अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे. वारंवार अवैध उत्खनना बाबत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. पण अजूनपर्यंत त्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
गुरुवारी सायंकाळी 7.45 वाजता अवैधरित्या ब्लास्टिंग करण्यात आली. रहदारीच्या मार्गावर दगडाचा खच पडला आहे. ब्लास्टिंग बाबत शासनाने नियम ठरवून दिले आहेत. ब्लास्टिंग ची काही बंधने कंपनीला आहेत. दुपारी 12.30 ते 1.30 व दुपारी 3.30 ते 4.30 वाजता ब्लास्टिंग च्या वेळा ठरवून दिलेल्या असताना ACC कंपनी चे मुजोर अधिकारी खुलेआम नियमाला तिलांजली देत असल्याचा आरोप निवेदनातून निखाडे यांनी केला आहे.
खनिकर्म अधिकाऱ्या मार्फत या माईन्स ची सखोल चौकशी करण्यात यावी व अवैध उत्खनन करणाऱ्या ACC गोवारी माईन्स च्या अधिकाऱ्यांवर तसेच ब्लास्टिंगशी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अधिकाऱ्यांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि माईन्स ची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत माईन्स बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.