* 7 महिन्यापासून मासिक सभा नाही
* सचिवावर कारवाईची मागणी, 6 सदस्य संतप्त
वणी बातमीदार: तालुक्यातील बोर्डा गावात अनेक समस्यांनी ठाण मांडले आहे. पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगताहेत. आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. कोविड कालखंडात सरपंच व सचिवांनी कोणतेही उपक्रम राबविले नाहीत असा घणाघाती आरोप चक्क 6 विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

बोर्डा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रवीण अनंता मडावी यांचे एप्रिल महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. तेव्हा पासून सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच गणेश दादाजी पायघन संभाळताहेत. गावातील विकासात्मक कामे तर सोडाच साध्या मूलभूत समस्या सोडविण्याचे सौजन्य दाखविल्या जात नाही. घोंसा येथून पाणी पुरवठा केल्या जातो मात्र ठिकठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बोर्डा गावात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी प्रभारी सरपंच व सचिव असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अमोल वाभीटकर, उमेश झाडे, प्रेमीला नक्षणे, पंजाब कुमरे, शारदा सातपुते, अर्चना आवारी ह्या सहा सदस्यांनी निवेदनातून केला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 3 मोटार बंदावस्थेत असल्याने 8- 8 दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांत रोष निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीत 2 कर्मचारी कर्तव्य बजावतात ते तीन वर्षांपासून मानधनापासून वंचित आहेत.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत सदस्यांनी विविध समस्येचा उहापोह केला आहे. मागील 7 महिण्यापासून ग्रामपंचायतीने मासिक सभाच घेतल्या नाहीत असा गौप्यस्फोट निवेदनातून करण्यात आला आहे तसेच शासनस्तरावरुन 15 ऑगस्ट ला प्रत्येक गावात ग्रामसभा व्हावी याकरिता सूचना दिल्या जातात मात्र यावर्षी ग्रामसभाच घेण्यात आली नाही. यामुळे ग्रामसचिव नेमकं काय करताहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गावातील समस्या तातडीने सोडवाव्यात व सरपंच, ग्रामसचिव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.