◆ कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार
◆ परिसरातील नागरिकांची तक्रार
वणी :- मंदिरात पुजारी म्हणून आलेल्या पुजाऱ्याचे परिवारासह मंदिरात वास्तव्य करीत आहे. आता तर चक्क या पुजाऱ्याने मंदिरासमोर अतिक्रमण करून भोजनालय सुरू केल्याने याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली असून कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार सुरू आहे.

शहरातील यवतमाळ मार्गावर गुरुवर्य कॉलनी आहे. प्लॉटधारक व सोसायटीने श्री गजानन महाराज यांचे मंदिर बांधण्याकरिता एक प्लॉट राखीव ठेऊन त्या ठिकाणी मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात पूजा करण्याकरिता पुजारी ठेवण्यात आला होता. आता त्याच पुजाऱ्याने मंदिरासमोर अतिक्रमण करून भोजनालय सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हे मंदिर परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान असून येथील नागरिक दर्शनाकरिता येत असतात. परंतू सद्यस्थितीत येथील अतिक्रमण केलेल्या भोजनाल्याच्या बांधकामामुळे व लगतच असलेल्या दारुभट्टीमुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा झाला आहे. त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश करतांना अडचण होत आहे. तसेच मंदिराचा हा परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दारुड्या लोकांनी भरलेला असतो. या परिसरात दारु पिऊन इतरत्र लोक पडून असतात. त्यामुळे मंदिरासमोर बांधण्यात आले भोजनालय व देशी दारूचे दुकानावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर परिसरातील शंभराच्या वर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे.
नागरिकांची तक्रार प्राप्त होताच त्या मार्गावर अतिक्रमण करणाऱ्या सर्वांनाच नगर पालिकेने नोटीस बजावल्या असून नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
तारेंद्र बोर्डे.नगराध्यक्ष, वणी