◆पोलिसांच्या आवाहनाला गावकऱ्यांचा प्रतिसाद
वणी:- मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी गणेशोत्सवा वर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे प्रशासनाच्या वतीने भक्तांना ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 22 गावात एक गाव एक गणपती ची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोना ची तिसरी लाट येऊ नये या करिता प्रशासन प्रयत्न करीत आहे.सध्या सणासुदीचे दिवस असल्याने या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करून सण उत्सव घरीच साजरे करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी करीत असल्याचे दिसत आहे.
10 सप्टेंबर ला गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.अनेक गावात सार्वजनिक मंडळे श्री ची स्थापना करतात.त्यामुळे एका गावात एकच गणपती बसविण्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन लुले यांनी गावा गावात जाऊन सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठका घेतल्या व ‘एक गाव एक गणपतीची’ संकल्पना मांडली याला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत 22 गावात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून 22 गावातही ‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबविण्यात आली आहे.यातील 12 गावातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार सचिन लुले यांनी दिली आहे.