* वाहतूक शाखा ऍक्टिव्ह मोडवर
वणी: अस्ताव्यस्त वाहतुकीला आळा बसावा याकरिता जिल्हा पोलिस प्रशासनाने वणीत वाहतूक उप विभागाचे निर्माण केले. शहरातील वाहतूक व्यवस्थेसोबतच परिसरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपविभाग सरसावला आहे. अवघ्या 8 महिन्यात 38 लाखाचा दंड वसूल केला आहे. दणदणीत कारवाया होत असल्याने वाहतूक शाखा ऍक्टिव्ह मोडवर असल्याचे दिसून येत आहे.
वणी शहरातील मध्यवर्ती भागात प्रमुख बाजारपेठ आहे. नगर रचना पुरातन असल्यामुळे ठीक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. बाजारपेठेतील प्रतिष्ठानसमोर वाहनतळ नाहीत. त्यातच पदपथावर बस्तान मांडलेले फेरीवाले यामुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच आहे. तत्कालीन उप विभागीय अधिकारी, ठाणेदार व पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महत्प्रयासाने शहरात एकेरी वाहतुक सुरू केली होती सध्यस्थीतीत बंद करण्यात आली आहे. याला जबाबदार विद्यमान अधिकारी की व्यापारी हा संशोधनाचा विषय आहे.
“टिळक चौकाने घेतला मोकळा श्वास”
वाहतूक उपविभागाचे सपोनि मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात सण-उत्सवा दरम्यान शहरात वेगवेगळ्या टिळक चौक, शिवाजी चौक, साई मंदिर परिसर आदी भागात अनेक पॉईंटवर गर्दीचे नियोजन केले आहे. तसेच रविवार दि. 12 सप्टेंबर ला टिळक चौक येथे मोठ्या प्रमाणात भाजी पाला हातगाड्या, फ्रुट हातगाड्या काढून टिळक चौक व शिवाजी पुतळा मोकळा केल्याने टिळक चौकाने घेतला मोकळा श्वास घेतल्याचे बोलल्या जात आहे.
वणी वाहतूक उप शाखेने जानेवारी 2021 पासून आज पर्यंत एकूण 12 हजार 846 केसेस केल्या आहेत. त्यातून तब्बल 25 लाख 89 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. न्यायालयात 244 चालन दाखल केल्यात. न्यायालयाने त्यांना 12 लाख 24 हजार रुपये दंड ठोठावला आहे. असा तडजोडीतून व कोर्टातून दोन्ही मिळून एकूण 38 लाख 13 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक उप शाखेने आतापर्यंत शहरात ऑटो चालक यांचे वर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाण्याबाबत (अवैध प्रवासी) कारवाई करण्यात आली. वाहन चालवितांना मोबाईल वर संभाषण करणारे इसम यांचे वाहन व परवाना निलंबित कारवाई सत्र मोहीम सुरू केली आहे. शहरातील मोटरसायकल व इतर वाहन चालक (कार चालक )आणि अवैध प्रवासी वाहतूक यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सत्र सुरू करून मागील थकीत ऑनलाइन चालन दंड वसुली सुरू करण्यात आली आहे. ऑटोचालक यांच्यावर अवैध प्रवासी केसेस करून दंड वसुली सुरू आहे तर पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात ऑटो अवैध प्रवासी, जड वाहतूक, मोटर सायकल आणि कारचालक यांच्यावर कारवाई करून चालन वसुली मोहीम सुरू आहे.