● नियमाचे पालन करा अन्यथा….
वणी: लालपुलिया परिसरातील कोल डेपो धारकाकडून पर्यावरणाबाबतच्या नियमावलीचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे शनिवार दि. 8 जानेवारीला ठाणेदारांनी कोळसा व्यावसायिकांचा class घेऊन नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव हद्दीत शेकडो कोल डेपो थाटण्यात आले आहे. कोळशाची साठवणूक व देशभरात वितरण त्या ठिकाणावरून करण्यात येते. मात्र शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करण्यात येत नाही.
अनेकदा वेकोली प्रशासनासोबत संगनमत करून कोळसा व्यावसायिक अनधिकृतपणे कोळसा डेपोवर रिचवतात यामुळे शासनाला कोट्यवधी चा चुना लावल्या जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शनिवारी ठाणेदार शाम सोनटक्के यांनी कोळसा व्यावसायिकांची बैठक घेतली.
कोळसा व्यावसायिकांनी चोरीचा कोळसा विकत घेऊ नये, कोळसा वाहतूक करताना वाहनावर ताडपत्रीचा वापर करावा, वाहनाचे दस्तऐवज वाहनासोबत ठेवावे, चालकांची पडताळणी करूनच कर्तव्यावर ठेवावे, मद्य प्राशन करणारे वाहन चालक नसावे, त्या बरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी कृती करूनये अशा सूचना याप्रसंगी दिल्यात.
वणी यवतमाळ रस्त्याच्या कडेला असलेल्या कोळसा डेपांमुळे फार मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोळसा डेपोमध्ये कोळसा हाताळणी, साठवणुक व वाहतुकीमुळे धुळ उत्सर्जित होऊन वायु प्रदुषण होण्याची सत्यता नाकारता येत नाही. आता ठाणेदारांनी दिलेल्या सूचनांचे पालन खरंच कोळसा व्यावसायिक करतील का ? हे काही दिवसात स्पष्ठ होणार आहे.
वणी: बातमीदार