● पोलिसांनी केले स्थानबध्द
वणी :-रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग मनमानी करत दुर्लक्ष करत होते. अतिशय दुरवस्था झाल्याने काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष पलाश बोढे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी चिखलगाव मार्गावर वाहने अडवून रास्तारोको करण्यात आला.

वणी परिसरात असलेल्या कोळसा खाणी मुळे ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे अनेक रस्त्याची दैयनिय अवस्था झाली आहे. वणी यवतमाळ मार्गावर असलेल्या चिखलगाव ते लालपुलिया पर्यंतचा मार्ग पूर्णतः उखडल्या गेला आहे. या मार्गावरून वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
उपरोक्त मार्गावर पडलेल्या खड्डयामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कोळशाने भरलेले वाहन ये -जा करीत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे.
याप्रकरणी युवक काँग्रेसचे वणी विधानसभा उपाध्यक्ष पलाश बोढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळविले मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बोढे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत दि 28 मार्च ला या मार्गावर रस्तारोको करून वाहतूक रोखणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता.
सोमवार दि 28 मार्चला या मार्गावर तब्बल एक तास वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाचरांगा लागल्या होत्या. पोलिसांनी रस्तारोको करणारे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पलाश बोढे सह 10 ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले होते.
येत्या काही दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारणार असल्याचे बोढे यांनी सांगितले आहे. यावेळी प्रदीप खेकारे, जितेश पुनियाला, सुमित वरारकर, विकी परगंटीवार, अशोक नागभीडकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार