Home Breaking News फसवणुकीचा नवा फंडा, दहा लाखाचे दागिने लंपास

फसवणुकीचा नवा फंडा, दहा लाखाचे दागिने लंपास

1448

बॅगेत रकमे ऐवजी मिठाचा पुडा

वणी: गांधी चौकात वास्तव्यास असलेल्या 62 वर्षीय व्यक्तीला वडिलोपार्जित दागिने विकायचे होते. याकरिता त्यांनी ओळखीच्या व्यक्तिमार्फत नागपूर येथील दोघांसोबत संपर्क साधला. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या व्यवहारात सोमवार दि. 16 ऑगस्टला रात्री 10 वाजताच्या सुमारास दहा लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले तर रकमे ऐवजी मिठाचा पुडा देऊन फसवणुकीचा नवा फंडा उजागर झाला आहे.

Img 20250422 wa0027

एसोद्दीन (40) व नुरेन (25) हे अनोळखी इसम नागपुरात वास्तव्यास असून यांचेसह अन्य एक अशा तिघांवर वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर विनोद तुलसीराम खेरा (62) रा. गांधी चौक वणी असे फसगत झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे.

Img 20250103 Wa0009

खेरा यांचे वडिलोपार्जित दागिने सोन्याची बांगड्या 4 ( मोती जडलेल्या), डायमंड पत्ती नेकलेस 1, खऱ्या मोत्याचा हार ( 5 लडीचा), गळ्यातील मोत्याची माळ 1, हिरा व माणिक जडलेली अंगठी 1, नाकातली नथ (मुखडा असलेली) 1 असे अंदाजे 10 लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले आहे.

विनोद खेरा यांना आपले वडिलोपार्जित दागिने विकायचे होते. म्हणून त्यांनी फॅमिली डॉक्टरच्या वाहनावर चालक म्हणून असलेल्या आबीद याचे सोबत संपर्क साधला. त्याने 6 महिन्यांपूर्वी खेरा यांची ओळख नागपूर येथील नुरेन सोबत करून दिली. त्याने एसोद्दीन या सवंगड्याला सोबत घेत तब्बल दहा वेळा वणी गाठली मात्र त्यांना दागिने दाखवण्यात आले नाही.

घटनेच्या दिवशी सकाळी 10 वाजता एसोद्दीन हा अन्य दोघांसोबत वणीत आला. खेरा यांच्या सोनेचांदीच्या दुकानावर ते भेटले. त्यानंतर रात्री 9 वाजता एसोद्दीन खेरा यांचे गांधी चौकातील घरी गेला. यावेळी एसोद्दीनला दागिने दाखविले असता त्याने दागिने रुमालमध्ये गुंडाळून खिशात ठेवले. याचवेळी दोन व्यक्ती लाल रंगाची मोठी बॅग घेऊन घरात आले व बॅगेत रक्कम असल्याचे सांगितले.

बॅगच्या कुलूपची चावी गाडीत राहिली असे सांगून तिघे बाहेर पडले व तिथून पसार झाले. त्यानंतर खेरा यांनी बॅग खोलून पाहिले असता त्यात मिठाचा पुडा आढळला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेरा यांनी रात्री 11.45 वाजता 100 नंबर वर कॉल केला. कॉल वरून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार , ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी एसोद्दीन, नुरेन व इतर एक असे तिघांविरुद्ध कलम 420, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
वणी: बातमीदार