Home Breaking News सुमधुर गीतांची मैफिल,सांज दिवाळी

सुमधुर गीतांची मैफिल,सांज दिवाळी

617

जैताई मंदिरात संपन्न

वणी : जैताई माता देवस्थान व श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 ऑक्टोबरला दिवाळी निमित्त सांज दिवाळी हा सुमधुर गीतांचा सुरेल कार्यक्रम संपन्न झाला. नगराळे हॉस्पिटलचे डॉ. संचिता नगराळे व विजय नगराळे यांच्या सौजन्याने श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी दिप प्रज्वलन करून केले. जैताई देवस्थानचे सचिव माधव सरपटवार यांच्या प्रास्ताविक भाषणांनातर विजय चोरडिया यांनी मार्गदर्शन करून कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

सांज दिवाळी या कार्यक्रमाची सुरुवात संगीत कला केंद्राचे संचालक अजित खंदारे यांच्या ‘सूर निरागस हो’ या गणपती वंदनेने झाली. या गीतावर निखिल वाघाडे या कलाकाराने नृत्य सादर केले. त्यानंतर तन्वी दोडेवार या गायिकेने ‘जय शारदे वागेश्वरी’ हे शारदा स्तवन सादर केले. शर्वरी बाविस्कर यांनी ‘ज्योती कलश झलके, आली माझ्या घरी दिवाळी, भले बुरे जे घडून गेले, गेला दसरा आली दिवाळी हासू नाचू ‘ ही गीते त्यांच्या सुरेल आवाजात सादर केली.

राधा कुचनकर या बाल गायिकेने ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गीत सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. डॉ. संचिता नगराळे या नव गायिकेने ‘ दिसले मजला सुखची, लक्षदीप या उजळल्या दारी, केव्हा तरी पहाटे व संतोष जोशी सोबत ‘राजा ललकारी’ हे युगल गीत सादर करून श्रोत्यांना आश्चर्यचकित केले.

संतोष जोशी या गायकाने ‘ये तो सच है की भगवान है, कभी बे कसी ने मारा कभी बेबसी ने मारा’ ही लोकप्रिय गीते गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. वैष्णवी हनुमंते यांनी ‘ दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथो मे जादू का पाणी’ ही गीते सादर केली. सिद्धार्थ घोगरे यांनी ‘शिर्डी वाले साईबाबा’ हे लोकप्रिय गीत गायिले. लिना हजारे यांनी फुलले रे क्षण माझे, हे गीत सादर केले.

निखिल वाघाडे यांनी तांडव नृत्य सादर केलं. देवयानी डोळस या गायिकेने ‘सोनियांच्या ताटी उजळल्या ज्योती’, राघव बाविस्कर या बाल कलाकाराने ‘माणसाने माणसाशी मानसा सम वागणे’ ही प्रार्थना सादर केली. सोनम सुरपाम यांनी ‘ वारा गायी गाणे, ध्रुव निखाडे यांनी ‘ आई भवानी तुझ्या कृपेने’ हा गोंधळ सादर केला.

देव मुकेवार या बाल कलाकाराने पियानो वाजवून वाहवा मिळविली. या कार्यक्रमात डॉ. ऐश्वर्या अलोणे यांनी सादर केलेली ‘दमा दम मस्त कलंदर’ या गीताने मैफिलीत चैतन्य संचारल होत. अजित खंदारे यांच्या अभंग गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना सतीश बाविस्कर यांनी केले. या सुमधुर संगीताच्या कार्यक्रमात यवतमाळ येथील कलाकार सौरभ देवधर यांनी तबल्यावर साथ दिली. कुमार सहारे कि-पॅड वर होते. अनिकेत सहारे आक्टो-पॅड तर सौरभ सहारे यांनी ढोलकी वादन केले.
वणी: बातमीदार