Home Breaking News काँग्रेसमधील धुसपुस पक्षाला तारक की मारक

काँग्रेसमधील धुसपुस पक्षाला तारक की मारक

991

सहकार क्षेत्रावर वर्चस्वाची लढाई

तुषार अतकारे | चंद्रपुर- आर्णी लोकसभा मतदार संघावर काँग्रेस पक्षाचे अधिराज्य असताना वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांमध्ये असलेली अंतर्गत घुसफुस पक्षाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वाढली आहे. आगामी काळात निवडणुकीची बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे पक्षामध्ये चैतन्य निर्माण होण्याची गरज असताना येथे अंतर्गत कलह पक्षाला शय्यावस्थेत नेतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी भारत जोडो पदयात्रा करीत आहे तर वणीचे नेते पक्ष तोडो-ची मात्रा वापरत आहे. नुकत्याच झालेल्या सहकारच्या निवडणूकीतून हे चित्र अधिकच स्पष्ट झाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील दोन नामांकीत सहकारी संस्थाच्या निवडणुकातून येथील राजकीय सारीपाटाच्या गोट्या कशा खेळल्यागेल्या हे स्थानिक मतदारांनी अनुभवले आहे.

प्रतिथयश श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचेचे दोन गट एकमेकापुढे लढाईसाठी सज्ज झाले. वास्तविकता काँग्रेसच्या सर्व पुढाऱ्यांनी समेट घडवून आणला असता तर कदाचीत ही निवडणूक बिनविरोध झाली असती. काँग्रेस पक्षातच ऐक्य नसल्याने विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.

रंगनाथची निवडणूक काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी झाली. त्या निवडणुकीत ऍड. देविदास काळे यांनी स्वपक्षीय जेष्ठ नेते माजी आमदार वामनराव कासावार यांच्या गटाची दाणादाण उडवली. पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाल्याचे विरोधकांना जाणवले. त्या निवडणुकीत पक्षात ऐक्य असल्याचे दिसले असते तर विरोधकांवर चिंतन करण्याची वेळ आली असती.

काँग्रेस पक्षातच आलबेल नसल्याने विरोधक सतर्क झाले. रंगनाथच्या निवडणुकीत काँग्रेसमधील शितयुद्धाचे क्षणचित्रे भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी टिपले आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य वसंत जिनिंगच्या निवडणुकीत शिरकाव करण्यासाठी सज्ज झाले. तसेच रंगनाथचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार कासावार यांनी आपल्या राजकीय जीवनातील डावपेच अमलात आणले.

रंगनाथच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांत समेट घडावा म्हणून खा. बाळू धानोरकर यानी शिष्टाई केली होती ती असफल झाली. वसंत मध्ये सुद्धा दोघांनी एकत्र यावं असं खासदारांना वाटत होतं मात्र रंगनाथचा मिळालेला एकतर्फी विजय यामुळे ऍड काळे यांना प्राप्त झालेली स्फूर्ती ताडजोडीपर्यंत पोहचली नाही 

 काँग्रेस पक्षातील नेत्यांनी एकमेकांविरोधात रणशिंग फुंकले. ऍड. काळे व माजी आमदार कासावार यांनी आपापले गट वसंतच्या निवडणुकीत उतरवले. विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सुद्धा पॅनल उभे करून तगडे आव्हान निर्माण केले तर भाकपा, शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेड यांनी चवथे पॅनल वसंतच्या आखाड्‌यात उतरवुन निवडणूकीत रंगत आणली.

अँड. काळे यांची वसंतवर सत्ता होती त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नविन मतदार करून घेतले. तसेच वसंतची संपत्ती विकुन वसंतचा विकासही घड‌वुन आणला. संस्थेला उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून दिले त्यामुळे मतदार आपल्याला नाकारणार नाही असा त्यांना विश्वास होता. मात्र झरी तालुक्यातुन आम्ही करिश्मा घडवुन आणू अशी कासावारांनाही खात्री होती. लढत अतिशय चुरशीची झाली. मात्र कासावारांच्या पॅनलला शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकरांच्या शिवसेनेनी दिलेली साथ परिवर्तनाची नांदी ठरली.

रंगनाथ व वसंत जिनिंग या दोन्ही संस्था काँग्रेसच्याच पदरात पडल्या असल्या तरी त्या काँग्रेसमध्ये दरी निर्माण करून गेल्या हे निश्चित. ही दरी आगामी सार्वत्रीक निवडणुकीमध्ये मिटलेली दिसेल की ती अधिक रूंदावेल याचे भाकीत आत्ताच करता येणार नाही. आता 19 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागलेल्या आहेत. लवकरच जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या तसेच नगर परिषदेच्या निवडणूक लागणार आहे. तोपर्यंत काँग्रेसमधली दुभंगलेली मने एकत्र न आल्यास काँग्रेसला धोकाच पत्करावा लागणार आहे. काँग्रेसमधील वचप्याचे राजकारण भाजपा-शिवसेनेसाठी पुरक ठरणार तर नाहीना अशा शंकाना पेव फुटले आहे