● वासेकर, खाडे की आवारी
● तुल्यबळ दावेदार, उत्सुकता शिगेला
रोखठोक |: सहकार क्षेत्रात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या वसंत जिनिंग अँड प्रेसिंगची निवडणूक नुकतीच पार पडली. चुरशीच्या या निवडणुकीत कासावर गटाने बाजी मारली. दि 22 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवड होणार असून प्रमोद वासेकर, संजय खाडे की पुरुषोत्तम आवारी या तुल्यबळ नेत्यापैकी कोणाची वर्णी लागेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वसंत जिनिंग अँड प्रेसिंग ची निवडणूक 6 नोव्हेंबर ला पार पडली होती. या निवडणुकीत चार पँनल च्या 63 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. या निवडणुकीत काँग्रेस मध्ये दुफळी निर्माण झाल्याने वामनराव कासावार व ऍड देविदास काळे यांचे दोन गट निर्माण झाले होते तर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि अनिल हेपट यांनी देखील आपले पँनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.
वसंत ची निवडणूक अतिशय चुरशीची झाली मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात कासावर गटाच्या परिवर्तन पँनलने 17 पैकी 15 जागा जिकल्या तर काळे गटाला अवघ्या दोन जागातर तिसऱ्या स्थानांवर आमदार गटाला समाधान मानावे लागले.
वसंत जिनिंगच्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे नेते निवडून आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची याचा पेच पक्षश्रेष्ठींना नक्कीच पडणार आहे यात काही शंका नाही. मात्र प्रमोद वासेकर, संजय खाडे व पुरुषोत्तम आवारी या नावांची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
प्रमोद वासेकर हे काँग्रेस तालुकाध्यक्ष आहे तसेच ते मागील संचालक मंडळाते होते. त्यामुळे त्यांना वसंत जिनिंगच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. संजय खाडे यांनी देखील काँग्रेस पक्षाचे विविध पदे भूषविली असून ते माजी संचालक सुध्दा होते तसेच काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते तर पुरुषोत्तम आवारी हे काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत असून ते पक्षात सक्रिय आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रातील निवडणूका सातत्याने तुल्यबळ ठरतात. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात निवडणुका जिंकण्याची चढाओढ बघायला मिळते. यावेळी काँग्रेस पक्षातच फूट पडल्याने मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत वसंत जिनिंगची सत्ता कोण बळकावेल हे कळत नव्हते. अखेर कासावार यांच्या गटाने यश मिळवले. आता अध्यक्ष कोण हे पक्षश्रेष्ठी ठरवणार असले तरी वासेकर, खाडे की आवारी हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वणी : बातमीदार