● हा काय प्रकार याबाबत संभ्रम
रोखठोक | पत्रकार तसेच वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. वणीतील त्यांचे अतिक्रमित झेरॉक्स सेंटर पूर्वसूचना न देता हटवल्याने व्यथित झाले होते. त्यातच शनीवारी रात्री त्यांचे “भोयर झेरॉक्स व रसवंती” हे दुकान आगीने कवेत घेतले. बेपत्ता भोयर यांचे झरीतील दुकान पेटवले की पेटले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
● हे विरोधकांचे षडयंत्र ●
माझे पती दिलीप भोयर यांनी अल्पावधीत राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. सोबतच त्यांनी परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी लहानसहान व्यवसाय सुरू केले. विरोधकांनी मात्र पोटावर मारण्याचे कुटील कृत्य केले व करताहेत. माझे पती दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत ते सुखरुप परतावेत अशी अनेक दुकाने नव्याने स्थापित करू व विरोधकांचे षड्यंत्र हाणून पाडू.
सुकेशनी दिलीप भोयर, वणी
वणी शहरात पालिका, महसूल व पंचायत समिती प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहे. त्यातच शासनाच्या जागेवरील अतिक्रमण सुध्दा काढण्यात आले. रस्त्यावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण काढले त्याप्रमाणेच धनदांडग्याचे अतिक्रमणे काढावे असा सूर उमटत आहे.
दिलीप भोयर यांचे तहसील परिसरातील झेरॉक्स सेंटर काढण्यात आल्याने ते व्यथित झाले होते. त्यांनी फेसबुक वॉल वर अनेक कमेंट तथा पोस्ट शेअर केल्या. “भावांनो मी खचलो, मला माफ करा…ही माझी शेवटची पोस्ट आहे” अशी पोस्ट शेअर करून त्यांनी खळबळ उडवून दिली आणि तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. याबाबत त्यांच्या पत्नी सुकेशनी भोयर यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
त्यातच झरी तहसील कार्यालयालगत असलेले त्यांचे भोयर झेरॉक्स व रसवंती हे दुकान पेटले की पेटवण्यात आले हे कळायला मार्ग नाही. शनिवारी रात्री दुकानाला आतून आग लागली तर रविवारी पहाटे ही बाब उघडकीस आली. हा काय प्रकार आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला असून पोलिसांनी योग्य प्रकारे शोध घेणे गरजेचे झाले आहे.
वणी: बातमीदार