● अधिकारी व टोल माफियांवर करवाई करा
● महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक
Wani News : शासकीय नियमांना तिलांजली देत मनमानी टोल वसुली करणाऱ्या आय.व्ही.आर.सी.एल कंपनीवर कारवाई करावी व सुरु असेलेली टोल वसुली तात्काळ थांबवावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दिले. तसेच यासर्व गैरप्रकाराला बांधकाम विभागाचे पाठबळ असल्याचा आरोप करण्यात आला. Action should be taken against IVRCL company for collecting arbitrary toll
चंद्रपूर-घुग्गूस-करंजी हा रस्ता तयार करण्याचे काम आय.व्ही. आर. सी. एल कंपनीला देण्यात आले होते. सदर रस्ता तयार झाल्या नंतर कालदोष मर्यादे पर्यंत या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे त्याच बरोबर हा रस्ता स्वच्छ ठेवण्याचे काम संबधित कंपनीचे आहे.
वणी आणि परिसरात खनिज संपत्ती मोठया प्रमाणात आहे. कोळसा, सिमेंट, रेती आदी खनिजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. दळणवळणामुळे या मार्गावर धुलीकण प्रदुषण कमालीचे वाढले आहे. रस्त्यावर साचलेल्या धुळीमुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सोबतच मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
चंद्रपूर-घुग्गूस-करंजी या मार्गावर अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात पोहचविण्याचे काम संबधित कंपनीचे असते. मात्र सदर कंपनीची एकही रुग्णवाहिका या रस्त्यावर कार्यरत नाही. कंपनी कडून प्रवाशांकरिता स्वच्छता गृहाची व्यवस्था सुद्धा नाही. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले नाही. या सर्व सुविधा नसताना देखील सुद्धा कंपनीच्या सर्व टोलनाक्यावर प्रवाशांकडून दिवसाकाठी लाखो रुपयांची टोल वसूली केली जात असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
नियम आणि अटींना तिलांजली देत काम करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करून ही बेकायदेशीर टोल वसुली तात्काळ थांबावावी अशी भुमीका मनसेने घेतली आहे. येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास ही टोल वसुली मनसे स्टाईलने बंद पाडू व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना विलन बोदाडकर, रंजीत बोंडे, गोवर्धन पिंपळकर, अविनाश जूनघरी, खुशाल काकडे, निकेश आत्राम कुणाल डोंगे, दिपक डोंगे, प्रविण मांडवकर, सुरज काकडे, प्रकाश ढवस, विजय चोखारे, कुणाल माहुरे, राहुल पचारे आदी उपस्थित होते.
Rokhthok News






