● पालकमंत्री संजय राठोड पक्ष बांधणीसाठी सज्ज
Political News :
माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते विश्वास नांदेकर यांची चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राठोड यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Tiger Returns: Former MLA Vishwas Nandekar Lok Sabha Coordinator
गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर, संघटनेला अधिक मजबुती देण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्यासाठी नांदेकर यांच्याकडे समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विश्वास नांदेकर हे यवतमाळ जिल्ह्यातील जेष्ठ व मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांची आक्रमक राजकीय शैली आणि संघटन कौशल्य यामुळेच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे मानले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झंझावाती रणनीती आखली आहे. संघटनात्मक बांधणी व अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि लोकसभा स्तरावर सक्षम नेतृत्व उभे केले जात आहे. या रणनीतीत नांदेकर यांचं योगदान अत्यंत मोलाचं ठरणार आहे.
विश्वास नांदेकर यांची ही नियुक्ती म्हणजे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी घडामोड असून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग येण्याची शक्यता आहे.
Rokhthok News






