● तीन माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, गाव पुढारी शिवसेना (उबाठा)च्या वाटेवर; वणी मतदारसंघात राजकीय घमासान
Political News
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहे. भाजपचे तगडे मोहरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या गळाला लागले आहे. तर अन्य पक्षातील काही गावपुढारी अस्तित्वाच्या शोधात आहे. यामुळे वणी परिसरात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. The political equation is changing rapidly in Wani Assembly constituency.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमधील दोन व अन्य एक माजी जिल्हा परिषद सदस्य, काही सरपंच आणि गाव पातळीवरील प्रभावशाली नेते लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत. या हालचालीमुळे भाजपची घडी विस्कटण्याची शक्यता वर्तवली जात असून, वणी मतदारसंघात शिवसेनेने आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दरम्यान, उबाठाचे ‘संजय’ नामक त्रिकूट अशी ओळख असलेले खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर व जिल्हा प्रमुख संजय निखाडे हे संघटनात्मक बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, शाखा बळकटीकरण व स्थानिक पातळीवरील नेतृत्व जोडण्यावर भर दिला जात आहे.
वणी, झरी-जामणी, मारेगाव भागात शिवसेनेने भाजपविरोधात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर अन्य राजकीय पक्ष भाजप विरोधात कशी रणनीती आखणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या या हालचालीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचे पारडे जड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, विधानसभेत भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते. आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक असणार आहे.
Rokhthok






