Home Breaking News दुःखद : विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन

दुःखद : विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन

● मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

C1 20251222

मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Sad News :
वणी विधानसभेचे माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) यवतमाळचे लोकसभा समन्वयक विश्वासभाऊ रामचंद्र नांदेकर यांचे रविवारी मध्यरात्री 11 वाजता दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली. Sad: Vishwasbhau Nandekar passes away

विश्वासभाऊ नांदेकर हे धडाडीचे, अभ्यासू आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 2004 ते 2009 या कालावधीत वणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आमदार म्हणून काम पाहिले. आमदारकीच्या काळात त्यांनी प्रशासनावर वचक ठेवला होता. अवैध व्यवसायाला थारा दिला नाही. शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत.

कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि जनतेसाठी सदैव झटणारा नेता अशी त्यांची ओळख होती. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाशी नाते जपणारे नेतृत्व म्हणून त्यांना मान दिला जात होता. शिवसेनेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघटनात्मक बांधणीवर भर दिला. सध्या ते शिवसेना (शिंदे गट) यवतमाळचे लोकसभा समन्वयक म्हणून सक्रिय होते.

Img 20250103 Wa0009

त्यांच्या अचानक जाण्याने वणी विधानसभा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. विश्वासभाऊ नांदेकर यांचे पार्थिव सोमवारी दुपारी 2 वाजता पासून त्यांच्या रवी नगर येथी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून मंगळवारी सकाळी त्यांच्या गावी पठारपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि असंख्य समर्थक असा परिवार आहे.

जनतेसाठी अखेरपर्यंत झटणाऱ्या या नेत्याच्या निधनाने वणीचा एक लढवय्या वाघ काळाच्या पडद्याआड गेला आहे. रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
Rokhthok