● फायर ऑडिट करण्याची केली होती मागणी
● संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा
वणी: शहरातील सर्व शासकीय व अशासकीय आस्थापना तसेच खाजगी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाचे फायर ऑडिट करावे अशी मागणी करण्यात आली होती. संभाव्य अग्नितांडवाबाबत मनसेने केलेले भाकीत अवघ्या तीन दिवसातच खरे ठरले आणि पंचायत समितीची ‘उमेद’ आगीत खाक झाली.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उप विभागीय अधिकारी यांना 22 फेब्रुवारी ला निवेदन देत फायर ऑडिट करण्याची महत्वपूर्ण मागणी केली होती. फायर ऑडिट बाबत प्रशासनाचा निरुत्साह सातत्याने जाणवत असल्याने मनसे स्टाईल आंदोलनाचे हत्यार उगारावे लागतील असा इशारा सुध्दा निवेदनातुन देण्यात आला आहे.
राज्यात तसेच देशामध्ये अनेकदा शॉर्टसर्किट व इतर कारणास्तव शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, दवाखाने आदी ठिकाणी अग्नितांडव होऊन जीवित व वित्तहानी झाल्याचे मनसेने निवेदनातून अधोरेखित केले होते.
शुक्रवारी रात्री पंचायत समिती मधील शिक्षण विभागाच्या लगतच असलेल्या ‘उमेद’ च्या कार्यालयाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज, संगणक व कार्यालयीन साहित्य जळून खाक झाले.
या अग्नितांडवात शासनाची मोठी वित्त हानी झाली याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उंबरकर यांनी उपस्थित केला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार





