● हत्त्येचा गुन्हा नोंद, प्रकरण घातपाताचे.!
वणी: सोमवारी सकाळी राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात 39 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळावरील निरीक्षण व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे पोलिसांनी हत्त्येच्या दिशेने तपास आरंभला होता. त्यातच डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर ‘अतुल’ चा गळा आवळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

अतुल सहदेव खोब्रागडे (39) असे मृतकाचे नाव असून तो राजूर कॉलरीतील निवासी आहे. एका चूनाभट्टी वर तो कार्यरत होता. कामगारांना वेतन वाटपाचे काम तो करायचा. सोमवारी सकाळी चूनाभट्टी परिसरातील एका कामगारांच्या घरालगत संशयास्पदरित्या त्याचा मृतदेह आढळला होता.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करिता पाठवले होते. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती ‘अतुल’ चा गळा अवळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील रासा येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्या घटनेत पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून हत्त्येचा उलगडा केला होता. राजूर कॉलरी येथील घटनेत सुद्धा संशयाची स्थिती निर्माण झालेली असून रासा घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता निर्माण झाली आहे.
आकस्मिक मृत्यू की घातपात याबाबत संशय निर्माण झाल्यास मृतकाची पार्श्वभूमी, घटनास्थळावरील निरीक्षण आणि परिस्थितीजन्य पुरावा महत्वाचा असतो. त्यातच वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवलेला अंदाज ग्राह्य धरून पोलिसांनी हत्त्येचा गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी ठाणेदार शाम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे पुढील तपास करीत आहे.
वणी: बातमीदार