● शालेय विद्यार्थ्यांनी वाईट व्यसन टाळावे
● ठाणेदारांनी केले मार्गदर्शन
वणी: पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधुन वणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात ठाणेदार शाम सोनटक्के यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाईट व्यसनापासून दूर राहून शैक्षणीक प्रगती करावी असे या प्रसंगी आवाहन करण्यात आले.

शालेय तथा महाविद्यलयीन विद्यार्थ्यांत नकारात्मकता निर्माण होतांना दिसत आहे. स्वतःचे आयुष्य स्वतः च रेखाटावे लागणार आहे. शैक्षणिक प्रगती हेच ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरूण वयातील मुलांनी समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करावा व आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करावे असे स्पष्ट करत ठाणेदार शाम सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांनी व्यसन टाळावे असे आवाहन केले.
काही दिवसांपूर्वी येथील एका शाळेतील विद्यार्थी आपापसात भिडले. क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांत भांडणे झाली, हा क्षणिक राग भविष्यातील दिशा बदलणारी ठरू शकते तरी मुलांनी वाईट व्यसनाकडे न वळता मैदानी खेळ, शारीरिक व्यायामाकडे लक्ष दयावे तसेच लहान मुलांनी आपआपसात भांडणे न करता सलोख्याने व मैत्रीपूर्ण वातावरणात रहावे असे ठाणेदार सोनटक्के यांनी स्पष्ट केले.
पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने समुपदेशन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 7 जानेवारीला सकाळी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. सुनिल पावडे हे उपस्थीत होते, कार्यक्रमाचे संचलन प्रा.आनंद हुड तर आभार प्रदर्शन प्रा. प्रसन्ना जोशी यांनी केले
वणी: बातमीदार