◆ वर्षभरापासून प्रभारावर हाकला गाडा
◆ विकासात्मक कामाला मिळेल गती
वणी: जिल्ह्यातील महत्वपूर्ण नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी पालिकेचा गाडा संपूर्ण वर्षभरापासून प्रभारावर हाकला जात होता. अनेक विकासकामे खोळंबल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे त्यातच कोरोनाचे संकट. कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा या करिता सातत्याने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला यामुळेच एकदाचे मुख्यधिकारी पालिकेला लाभले आहे.

प्रशासनाने कोवीड-19 प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून अभिजीत वायकोस यांचेवर वणी पालिकेच्या मुख्यधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. ते यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे कार्यरत होते. वणी पालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे. शहरात प्रत्येक प्रभागात विकासात्मक कामे होताहेत. 12 ऑगस्ट 2020 ला मुख्यधिकारी संदीप बोरकर यांची प्रशासकीय बदली झाली होती. त्यानंतर वेळोवेळी प्रभारावर कामकाज रेटण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“रोखठोक” मध्ये 6 सप्टेंबर ला “आठ महिन्या पासून नगर पालिका ‘प्रभारावर’, विकास कामांना बसत आहे खीळ” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. पालिकेचे प्रशासकीय कामकाज सांभाळताना कायमस्वरूपी मुख्यधिकारी असणे गरजेचे आहे. प्रभारामुळे शहराची विकासात्मक गती मंदावली होती आता मुख्यधिकारी म्हणून अभिजीत वायकोस यांची वर्णी लागल्याने विविध कामांना चालना मिळणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट वेगात पसरत असतानाच बोरकर यांची बदली करण्यात आली. कोरोनाच्या कालखंडात शहराची भिस्त असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करणे संयुक्तिक नव्हते. काहीकाळ नायब तहसीलदारांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला परंतू आपत्ती व्यवस्थापन करतांना योग्य ताळमेळ साधता आला नाही म्हणूनच झरी जामनी येथील मुख्यधिकारी संदीप माकोडे यांना प्रभार देण्यात आला होता. त्यांनी घेतलेला प्रभार निव्वळ देखावा ठरला.
प्रभारी मुख्याधिकारी माकोडे हे आठवड्यातून दोनच दिवस पालिकेत उपस्थित राहत होते यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. विविध कामाच्या प्रशासकीय मान्यतेचे काम रखडले आहे. त्याच बरोबर उभारण्यात येत असलेल्या भव्य सांस्कृतिक भवनाच्या आतील सजावटीच्या कामाची शासकीय मान्यता प्रलंबित आहे. नगर पालिका कर्मचाऱ्यांचे देखील अनेक कामे प्रलंबित आहेत. आता कायमस्वरूपी मुख्यधिकारी मिळाल्याने विविध विकासात्मक कामांना गती मिळणार आहे.