● 65 लाखाची अनियमितता
● 28 फेब्रुवारीला एकत्रित सुनावणी
उमरखेड : वसंत देशमुख – बहुचर्चित स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गंत सन 2018 साली उमरखेड नगर पालीकेत 65 लाख 17 हजार रुपयाची अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या कचरा घोटाळ्यात तत्कालीन नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाणे यांच्यासह 5 जणांना तात्पूरता अंतरिम जामिन मिळाला होता. तर उर्वरित चार जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता जिल्हा सत्र न्यायलयाने सदर अर्ज फेटाळून या प्रकरणातील सर्व आरोपींची एकत्रित सुनावणी येत्या 28 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे .

पालिकेतील बहुचर्चित घोटाळा प्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशनला एकुण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाणे, चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, सविता पाचकोरे, अमोल तिवरंगकर यांना पुसद सत्र न्यायालयाने तात्पुरता अंतरिम जामिन मंजूर केला आहे .
त्यानंतर शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी रोजी यातील आरोपी फिरोजखान आझादखान, गजानन मोहळे, लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावर सरकारी पक्षाच्या वतिने आक्षेप घेण्यात आला व प्रकरणातील सर्वच आरोपींची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी सरकारी वकिलांमार्फत न्यायालयाला केली.
यावर न्यायालयाने चारही आरोपींचा जामिन अर्ज फेटाळून लावला व येत्या 28 फेब्रुवारी रोजी प्रकरणातील सर्व आरोपींच्या जामिन अर्जावर एकत्रित सुनावणी ठेवण्यात आली आहे. कागदोपत्री तपास असल्याने रेकॉर्डनुसार पुरावे मिळविण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरु असून प्रकरणात आधीच्या भादंवि 420 , 409, 465, 467, 468, 471, नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर सदर प्रकरणात न्यायालयात म्हणणे सादर करतांना आणखी भादंवि 120 (ब ), 4O6 या दोन कलमांची वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
उमरखेड: बातमीदार