Home Breaking News खाऊचे पैसे, विद्यार्थ्यांचा उत्‍साह आणि शिक्षकांचा गौरव

खाऊचे पैसे, विद्यार्थ्यांचा उत्‍साह आणि शिक्षकांचा गौरव

● अहेरअल्‍ली शाळेत पार पडला सोहळा

166

अहेरअल्‍ली शाळेत पार पडला सोहळा

रोखठोक | शाळेतील आपल्या आवडत्‍या शिक्षकाला जिल्‍हास्‍तरीय पुरस्‍कार मिळाला, विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. चक्‍क चिमुकल्‍या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे जमा करुन गावात अभिनंदनाचे दोन भव्‍य बॅनर लावले आणि छोटेखानी कार्यक्रमात त्‍या शिस्तप्रिय शिक्षकांचा चिमुकल्यांनी व ग्रामस्‍थांनी अनोखा सत्कार केला.

Img 20250422 wa0027

जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा अहेरअल्‍ली येथील शिक्षक शंकर रामलू केमेकार यांना नुकताच यवतमाळ जिल्हा परिषद उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार देवून जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला. अशा आपल्या लाडक्या शिक्षकांचा सन्मान गावकऱ्यांनी करावा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी मांडली. त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या जवळील खाऊचे पैसे देण्‍याचा मानस व्यक्त केला.

Img 20250103 Wa0009

सत्कार 2

सरपंच हितेश राउत यांना कळताच त्‍यांनी सत्‍कार समारंभ आयोजीत केला. याप्रसंगी झरीचे गट शिक्षणाधिकारी मोहम्मद याकूब, उपसरपंच अनिल राऊत, शाळा व्यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष राजेश राऊत, उपाध्यक्ष मंगेश दुधकोर पोलीस विभागाचे सोयाम व गोडे, सचिव अतुल सिर्तावार, तलाठी संग्राम गिते तसेच नंदकिशोर राऊत, अरविंद केमेकार, विठोबा भोयर, संजय मन्ने, विनोद शिरपूरे, संजय सोनुले, संदीप केमेकार, दादाराव राऊत, अमित नागपूरे, दत्ताजी राऊत,  नितीन राऊत, शंकर राऊत, प्रल्हाद सिडाम, गजानन सिडाम, मधु भोयर, माणीक शेद्रे, चौधरी, दुधकोर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

आयोजीत कार्यक्रमात शिक्षक शंकर केमेकार यांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी मनोगत व्‍यक्‍त करतांना मान्‍यवरांनी शाळेचे शिक्षक केमेकार व शिक्षकवृंदाच्‍या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला. शाळेची व मुलांची शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यामागे शिक्षकवृंद यांचा वाटा कशाप्रकारे आहे हे नमुद करण्‍यात आले.

विविध उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्ता विकास हाच ध्यास शाळेचा होता. महादीप परीक्षा, आझादी का अमृत महोत्सव,  वक्तृत्व स्पर्धा, गित गायन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, राज्यस्तरीय शिक्षण परिषद,  ग्रेट भेट विथ CEO अशा एक ना अनेक उपक्रम शाळेत राबविण्‍यात येत असल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले. आयोजीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा बोडणकर, तर आभार प्रदर्शन सुधाकर राऊत यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.
वणी: बातमीदार