● शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
रोखठोक | तालुक्यात विपुल खनिज संपत्ती आहे त्यामुळे रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात खनिज निधी बाधित गावांच्या विकासाकरिता उपलब्ध होतो. मात्र हा निधी बाधित गावाकरिता खर्ची केल्या जात नसल्याने परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाकरिता तातडीने निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

वणी तालुक्यातील खान बाधित क्षेत्रातील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. उत्खनन झालेल्या खनिजांची अवजड वाहनातून होणारी वाहतूक सर्वार्थाने रस्त्याच्या दयनीयतेला जबाबदार आहे. शिंदोला मार्गे चंद्रपूर ला जाणारा जिल्हा मार्ग आहे. 1995 मध्ये निर्माण झालेल्या या मार्गाचे आजपर्यंत नुतनीकरण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार या मार्गाची वहन क्षमता 10 टनाची आहे मात्र त्या मार्गावरून शेकडो अवजड वाहने 50 टनाच्या वर क्षमतेची धावतात.
शिंदोला परिसरात खनिज व गौण खनिजांच्या मोठया प्रमाणात खदानी आहेत. यामार्गावरून परिसरातील खनिजांची वाहतूक अवजड वाहनातून होते यामुळेच रस्ते बाधीत झाले आहेत. त्याप्रमाणेच जिल्ह्याचे ठिकाण चंद्रपूर हे अल्प अंतरावर असल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण, महिला व स्थानिक नागरिकांना याच मार्गावरून ये-जा करावी लागते.
शिंदोला परिसरात एसीसी सिमेंट, वेकोलीच्या अधिनस्त कोळसा खाणी, हिवरदरा डोलोमाईट्स, मोहदा येथे गिट्टी खदानी आहेत. या सर्व उद्योगापासून दरमहा 50 कोटीच्या जवळपास महसूल शासनाला प्राप्त होतो. तरी देखील या परिसरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. यामध्ये वेळाबाई, मोहदा मार्गे नेरड राज्य मार्ग, आबाई फाटा ते बोरी राज्य मार्ग व शिंदोला ते चंद्रपूर जाणाऱ्या जिल्हा मार्गाचा समावेश आहे.
त्याप्रमाणेच वणी तालुक्यातील खान बाधीत गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तरी या सर्वाधिक महसूल देणाऱ्या बाधीत गावातील रस्ते नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा 1 जानेवारी 2023 नंतर या परिसरात होणारी खनिज संपत्ती ची वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याकरिता आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी शहरप्रमुख सुधीर थेरे, मोहदा येथील माजी सरपंच गौतम सुराणा उपस्थित होते.
वणी: बातमीदार