Home Breaking News ग्राहकांनो सावधान…मातीला आलाय लोखंडाचा भाव

ग्राहकांनो सावधान…मातीला आलाय लोखंडाचा भाव

1111

वॉल कंपाउंड च्या लोखंडी गेट मध्ये माती
ग्राहकांची फसवणूक..पोलिसात धाव

वणी :- म्हणतात ना मातीला काही किंमत नाही परंतू मातीला लोखंडाचा भाव आणण्याची किमया येथील एका वेल्डिंग व्यावसायिकाने करून दाखवली आहे.यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. व्यावसायिक कधी काय करेल याचा नेमच राहिला नाही. ग्राहकांचं नातं देवासारखं समजल्या जाते मात्र त्या ग्राहकांची फसवणूक करायलाही मागेपुढे न पाहणाऱ्यांना काय संबोधावं असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे.

Img 20250422 wa0027

शहरातील भाग्यशाली नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या एका सद्गृहस्थाने नवीन घराचे बांधकाम सुरू केले होते. घराच्या सभोवताल असलेल्या संरक्षक भिंतीला आकर्षक लोखंडी गेट बसविण्याचे ठरवले. याकरिता जुन्या हैद्राबाद मार्गावरील एका वेल्डिंग च्या दुकानात त्या सद्गृहस्थाने लोखंडी गेट बनवायला टाकले आणि इथेच त्यांची फसगत झाली.

Img 20250103 Wa0009

नवीन घर बांधताना विविध संकल्पना, स्वप्नं घरमालक रंगवतात. घराचा प्रमुख दरवाजा आकर्षक असावा याकडे विशेष लक्ष दिल्या जाते. घराच्या वॉल कंपाउंड चे गेट मजबूत असावे याकरिता दिलखुलास रक्कम खर्च करणारे अनेक महाभाग आहेत. यामुळेच आपले इस्पित साध्य करण्याची किमया व्यावसायिक करतांना दिसते.

जुन्या हैद्राबाद मार्गावरील त्या वेल्डिंगच्या दुकानात 90 रुपये किलो प्रमाणे गेट बनवायची ऑर्डर त्या सद्गृहस्थाने दिली. गेट तयार झाले, त्याचे वजन करण्यात आले, ते 123 किलो भरले आणि 11 हजार 70 रुपये अदा करून गेट घरी लावण्याकरीता आणण्यात आले. लोखंडी गेट लावत असताना वजन खूप जास्त वाटले व त्याला ठोकून पाहले असता आवाज वेगळा येत असल्याने संशय आला आणि बिंग फुटले.

भाग्यशाली नगर मध्ये राहणाऱ्या त्या सद्गृहस्थाने गेट ला ड्रील मशीन ने छीद्रे करून पाहले असता लोखंडी गेटच्या आतमध्ये पूर्ण माती भरून असल्याचे निदर्शनास आले. मातीला लोखंडाचा भाव आल्याने ते चक्रावले, आणि पोलिसात धाव घेतली. अशा प्रकारे आज पर्यंत कितीतरी ग्राहकांची फसवणूक झाली असेल हा संशोधनाचा विषय असून पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.