● त्या भंगारावरच मारला ताव
रोखठोक | मागील महिन्यात पालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. जप्त करण्यात आलेले अतिक्रमित लोखंडी ठेले व साहित्य वॉटर सप्लाय येथील अग्निशमन विभागाच्या आवारात ठेवण्यात आले होते. त्यावर काही कर्मचाऱ्यांचा डोळा होता, आणि तेच भंगार विकताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

अग्निशमन वाहन चालक देवीदास जाधव व फायरमन
शाम तांबे असे निलंबित करण्यात आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जप्तीतील लोखंडी साहित्य भंगाराच्या दुकानात विकत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
वणी नगर परिषदेच्यावतीने शहरात रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमित लोखंडी ठेले व विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले. पालिकेने ते भंगार साहित्य अग्निशमन विभागाच्या आवारात ठेवले होते.
अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान नगर परिषदेच्या वतीने जप्त करण्यात आलेले साहित्य चक्क विक्री केल्या जात असल्याची माहिती समोर आली. आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद यांनी पाळत ठेवली असता भंगाराच्या दुकानात जप्तीतील साहित्य विकताना दोघांना रंगेहात पकडले होते.
अतिक्रमण मोहिमेतील जप्त केलेले साहित्यच पालिका कर्मचाऱ्यांनी भंगारात विकल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे हे तपासणे गरजेचे असून मुख्यधिकारी वायकोस यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी होतांना दिसत आहे.
वणी : बातमीदार