Home Breaking News नगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेच्या कामाकरिता पाच कोटी मंजूर

नगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेच्या कामाकरिता पाच कोटी मंजूर

756

आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश

वणी | वणी नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. अडीच वर्षांपूर्वी राज्यात भाजपा सरकारच्या कार्यकाळात प्राप्त निधीमुळे शहरात अभूतपूर्व विकास झाला. पुन्हा राज्यात भाजपा व शिंदेसेना यांची सत्ता स्थापन होताच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस निधी वितरणाचे आदेश नगर विकास विभागाने निर्गमित केले असून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे नागरी सेवा व सुविधेच्या कामाकरिता पाच कोटी मंजूर करण्यात आले आहे.

Img 20250422 wa0027

सन 2014 मध्ये राज्य व केंद्रात भारतीय जनता पक्षाचा झंझावात निर्माण झाला. वणी विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून संजीवरेड्डी बोदकुरवार दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. तर चंद्रपूर- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खा. हंसराज अहिर यांची केंद्रात केंद्रीय गृहराज्य मंत्रीपदी वर्णी लागली. त्याच कालावधीत नगरपालिका निवडणुका पारपडल्या आणि वणीत भाजपची एकहाती सत्ता आली. तर युवा नेता तारेंद्र बोर्डे थेट जनतेतून निवडून येत वणीकरांची पहिली पसंती ठरली.

Img 20250103 Wa0009

नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेल्या बोर्डे यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना पूर्णत्वास नेल्या. निधीच्या उपलब्धतेसाठी खा. अहिर व आ. बोदकुरवार यांनी नगरविकास विभागातून विविध विकास कामाकरिता निधी खेचून आणला यामुळेच शहर विकासाला चालना मिळाली. शहरातील उद्याने, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, नाट्य संकुल आणि अतिशय महत्वपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आल्यात.

शासन निर्णयान्वये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. याकरिता वणी नगरपालिकेला 5 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र त्याकरिता काही अटी शर्थी निर्धारित करण्यात आल्या आहेत.

शासन निर्णयानुसार प्रत्येक कामाच्या रक्कम रूपये 10 लक्ष अथवा त्यापेक्षा जास्त किमतीस मान्यता देण्यात आली आहे. सबब, तांत्रिक मान्यता दिलेल्या प्रत्येक कामाच्या रक्कम रूपये 10 लक्ष अथवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. तसेच प्रत्येक काम ई-निविदेने करणे बंधनकारक आहे.

सदर प्रकल्पाअंतर्गतची कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावीत असे सुचविण्यात आले आहे. कामाचे स्वरुप सार्वजनिक असणार आहे, तसेच त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता कटिबद्ध असल्याचे आ. बोदकुरवार यांनी सांगितले.
वणी: बातमीदार