● त्या रस्त्यावर लहानसहान अपघाताची शृंखला
रोखठोक | वणी- वरोरा मार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. रस्ता बांधकाम कंपनी अतिशय बेजबाबदार पद्धतीने काम करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. एकता नगर जवळील रस्त्यावर नेहमी ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्याचे काम सुरू असल्याचे कळत नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

वरोरा मार्गावर एकता नगर पासून ते लोकमान्य टिळक महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे नव्याने बांधकाम सुरू आहे. एका बाजूचा रस्ता खरडून टाकण्यात आला आहे. बांधकाम कंपनीने सावधगिरी न घेता काम सुरु ठेवले यामुळे त्या मार्गावरील ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांचे अपघात होताहेत.
या मार्गावरून नेहमी मार्गक्रमण करणारे दुचाकीस्वार कोणतेही फलक नसल्यामुळे बिनधास्त जात असताना अपघात होताहेत. सोमवारी सायंकाळी 7: 30 वाजताच्या दरम्यान मोपेड दुचाकीवर जात असलेल्या माय-लेकी वाहन स्लिप झाल्याने पडल्या. तत्पूर्वी पाच ते सहा दुचाकीस्वार पडलेत. रस्ता बांधकाम करताना संबंधित कंत्राटदाराने सावधगिरी (precautions) बाळगण्याची नितांत गरज आहे.
नियमानुसार खबरदारी घ्यावी असे सक्त आदेश संबंधित विभागाला देण्यात आले असून कंत्राटदाराने बांधकाम करताना नियमाचे काटेकोर पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या प्रमाणेच रेडीयम, बॅरिकेट्स फलक लावूनच काम करावे तसेच नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी असे आदेशीत करण्यात आले आहे.
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वणी, वि.स.स.
रस्ता बांधकाम करताना वळण रस्ता फलक, किंवा बॅरिकेट्स लावणे गरजेचे आहे. तसेच नियमानुसार आखण्यात आलेल्या परंपरांचे पालन करावे लागणार आहे. आपल्याच मनमर्जीने नागरिकांना वेठीस धरणाऱ्या बांधकाम कंपनीवर तात्काळ कारवाई अशी मागणी केल्या जात असून संबंधित विभाग काय पवित्रा घेतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वणी : बातमीदार