Home Breaking News मतदारसंघासाठी नव्या जोमाचा उमेदवार तयार करा..!

मतदारसंघासाठी नव्या जोमाचा उमेदवार तयार करा..!

624

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कडाडले

सुनील पाटील: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आमदार असलेल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटना बांधणी करताना नव्या जोमाचा उमेदवार तयार करा असे म्हणत शिवसैनिक म्हणजे हिंदुत्वाचा अंगार आहे हे त्यांना दाखवून द्या असे उद्गार काढत शिवसैनिकांना चेतविण्याचे काम केले आहे.

Img 20250422 wa0027

महाराष्ट्रात भाजपाने 105 मतदारसंघ काबीज केले आहे. त्यातील बहुतांश मतदारसंघ अन्य पक्षातील भाजपात प्रवेशित बलाढ्य नेत्यांचे आहेत. परंतू ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे आणि लाटेत ती वाहून गेली तेथे शिवसेना उभारी घेण्याची रणनीती आखत आहे.

Img 20250103 Wa0009

वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना तुल्यबळ होती. ग्रामीण भागात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत असताना 2014 च्या निवडणुकीनंतर झालेली वाताहत सर्वश्रुत आहे. त्या ‘त्सुनामी’ नंतर शिवसेनेला जी ‘घरघर’ लागली ती अद्याप कायम आहे.

बऱ्याच कालावधीनंतर वणी विधानसभा मतदारसंघातील झरी व मारेगाव पंचायत समितीवर ‘भगवा’ फडकविण्याचे काम शिवसेना जिल्हा प्रामुख्याने मुत्सद्दीपणा दाखवत केले. परंतू ग्रामीण भागातील पूर्वी असणारी शिवसेनेची ताकद नव्याने निर्माण होईल का ? हे बघणे औत्सुक्याचे आहे.

मतदारसंघातील वणी, मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यात शिवसेनेचा दबदबा होता. जिल्हा परिषद व पंचायत समितीत निर्विवाद वर्चस्व असायचे. भाजपच्या झंझावातानंतर त्यात कमालीची घट झाली. या भयाण लाटेत केवळ एकमेव बालेकिल्ला शाबूत राहिला तो म्हणजे शिंदोला परिसर, आजही त्या भागातील तटबंदी मजबूत आहे.

संघटना बांधणी करताना नव्या जोमाचा उमेदवार तयार करा असे पक्ष प्रमुख म्हणत असले तरी एकनिष्ठ शिवसैनिकच खरा तारणहार असतो हे यापूर्वी सुद्धा सिद्ध झाले आहे. नवख्याला बाशिंग बांधून रणसंग्रामात उतरवले तर पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यावर अन्याय होणार आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पक्षहीत बघता जुन्या जाणत्या शिवसैनिकांना सोबत घेत नव्या दमाचे नेतृत्व निर्माण केले तरच भाजपाच्या गडाला खिंडार पाडता येईल अन्यथा…!