● मारेगाव तालुक्यातील घटना
मारेगाव: प्रात:विधी आटोपून परतणाऱ्या महिलेला घरात घुसून लोखंडी सळाखीने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी हिवरी येथील आरोपीला प्रथम श्रेणी न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अनिल लेतू मेश्राम असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो हिवरी येथील निवासी असून 16 मे 2017 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास प्रात:विधी आटोपून परतणाऱ्या महिलेला अडवून तू त्या ठिकाणी प्रातः विधीसाठी का गेली ? असे म्हणत शाब्दिक वाद उपस्थित केला.
त्याच दिवशी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून आरोपी अनिल लेतू मेश्राम याने लोखंडी सळाखीने डोक्यावर मारहाण करून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता वैशाली खंडारे यांनी युक्तिवाद केला. अंतिम युक्तिवादानंतर साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एन.पी. वासाडे यांनी आरोपीला दोन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
वणी: बातमीदार