● अखेर शिंदोला मार्गे बस सेवा सुरु
वणीः चंद्रपुर ते मुकूटबन व्हाया शिंदोला बसचा मार्ग नकोडा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे बंद करण्यात आला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी चंद्रपुर प्रशासनाला धारेवर धरत जिल्हा मार्ग बंद करणाऱ्या नकोडा ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी केली होती.

रविवार दि. 26 जुनला शिंदोला मार्गे जाणारी चंद्रपुर ते मुकूटबन ही बस बऱ्याच कालावधी नंतर सुरु करण्यात आली. यावेळी शिंदोला येथे बसचे पुजन करुन चालक व वाहक यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोरोनाचा कालखंड तसेच राज्यमार्ग परिवहन महामंडळातील कर्मचार्यांचा संप यामुळे बस चे अवागमन विस्कळीत झाले होते. या कालावधी दरम्यान नकोडा ग्रामपंचायतीने चक्क रस्त्यावर बॅरीकेट्स टाकून हा मार्गच बंद केला होता.
परिस्थिती निवळल्या नंतर सुध्दा यामार्गावरुन बसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याने मुंगोली, माथोली, साखरा, परमडोह, चिखली, टाकळी, शेवाळा, चनाखा, कोलगाव, शिवणी, येनक, येनाडी, पाथरी, कुर्ली, शिंदोला व परिसरातील शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्गात शिकणारे विध्यार्थी- विद्यार्थिनींची तसेच महिला, गर्भवती, विविध आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्यात आले.
प्रवाश्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता शिवसेना उपजिल्हा प्रमुख निखाडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी परिसरातील विध्यार्थी, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व नागरिकांसह 26 जून ला मुंगोली पुलावर चक्काजाम करण्यात येईल असा इशारा दिला होता. अखेर प्रशासनाने रास्त मागणी लक्षात घेता पुर्ववत बससेवा सुरु केल्याने परिसरातील नागरीकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी: बातमीदार