● आयजी च्या पथकाची कारवाई
वणी : शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आयजी च्या पथकाने शनिवारी धाडसत्र अवलंबले होते. यामध्ये मटका अड्डया सह सुगंधित तंबाकू व गुटखा विक्री करणाऱ्या दोन दुकानावर छापा टाकला. यामध्ये 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाकू व गुटख्यावर बंदी घातली आहे. मात्र शौकिनांचे चोचले पुरविण्यासाठी याची विक्री व्यावसायिक ‘पटेल’ त्या भावात ग्राहकांना करीत आहे. शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेले तंबाखू सम्राटांचे दुकान व जुने बस स्थानक परिसर हा गुटखा, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व शासनाला चुना लावून दररोज हजारो किलो सुपारीची विक्री करणारे ठिकाण बनले आहे.
सुगंधित तंबाखू, सुपारी व गुटखा याची तालुक्याच्या लगतच असलेल्या तेलंगणा राज्यातून तस्करी केली जात आहे. वणी पोलिसांनी अनेक कारवाया करून लाखो रुपयांचा मुद्देमाल आता पर्यंत जप्त केला आहे. तरी देखील हे व्यावसायिक जुमानतांना दिसत नसल्याचे शनिवारी झालेल्या कारवाईतून उजागर झाले आहे.
शनिवारी 29 जानेवारीला पोलीस उप महानिरीक्षक चंद्रशेखर मीना यांच्या पथकातील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अचलपूर चे उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या नेतृत्वाखाली शहरात चार मटका अड्डयावर धाड टाकली होती. हे पथक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी जुने बस स्थानक परिसरात असलेल्या दोन दुकानाची झडती घेतली होती.
अनिल व्यवहारिमल नागदेव याचे दुकानातून विविध 12 ब्रँडचे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले त्याची किंमत 47 हजार 188 रुपये तर दीपक कवडू चावला याचे कडून विविध 14 ब्रँडचे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले 4 लाख 16 हजार 542 रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम पंजाबराव दंदे यांच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार





