
● तीन तास वाहतूक ठप्प, पोलिस प्रशासनाची मध्यस्थी
Political News :
वणी शहराला नागपूर आणि यवतमाळला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक आंदोलन केले. चिखलगाव रेल्वे गेट येथील निर्माणाधीन पुलाच्या 30 फूट उंचीच्या खांबावर चढून मनसैनिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे शहरात तब्बल तीन तास वाहतूक पूर्णपणे थांबली. And…..MNS workers climbed the flyover pillars
शहरातील चिखलगाव रेल्वे गेट आणि संविधान चौकातील उड्डाणपुलांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पर्यायी रस्त्यांची (सर्व्हिस रोड) योग्य व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी, चिखल, धूळ आणि अपघातांचा धोका वाढला आहे. मनसेने यापूर्वीच प्रशासनाकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या मनसेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी सकाळी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी मुकुटबन रस्ता आणि यवतमाळ रस्ता अडवून वाहतूक थांबवली. आंदोलनादरम्यान काही मनसैनिक निर्माणाधीन पुलाच्या खांबावर चढले आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरवून ताब्यात घेतले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असताना, पोलिसांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या मनसैनिकांना सोडून देण्यात आले आणि आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आंदोलनानंतर पोलिस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक, मनसे नेते राजू उंबरकर, रेल्वे निरीक्षक बलवीर सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक सचिन नागपुरे, जुगलकिशोर दिवाण आणि संबंधित कंपनीचे अभियंता हर्षित कुमार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. व येत्या दोन महिन्याच्या आत हे काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, बांधकाम कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यामुळे आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते, याकडे वणी शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, रुपेश ढोके, विलन बोदाडकर, परशुराम खंडाळकर, महेश हातगावकर, विठ्ठल बोथाडे, शंकर पिंपळकर, मयुर घाटोळे, धीरज पिदूरकर, प्रविण कळसकर, कैलास निखाडे, प्रदीप बदखल, गुड्डू वैद्य यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्त उपस्थित होते.
ROKHTHOK






