● कुटुंबीय महाराष्ट्र दर्शनाला, एकटेपणाने घेतला शेवटचा श्वास…..
Sad News :
शहरातील गोकुळनगर परिसरात एका इसमाचा कुजलेला मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ही घटना उजागर झाली. 4 ते 5 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. Body found in bathroom, incident revealed due to foul smell
श्रीरंग रामभाऊ पडोळे (47) असे मृतकाचे नाव आहे. तो नातेवाईकांकडे गोकुळ नगर परिसरात वास्तव्यास होता. गुरे चराईचे काम करून तो उदरनिर्वाह करायचा. व्यसनामुळे कुटुंबाशी त्यांचे संबंध बिघडले होते यामुळे पत्नी व मुले विभक्त राहत असल्याचे सांगण्यात येते.
घटनेच्या दिवशी घरातील सदस्य महाराष्ट्र दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याचदरम्यान पडोळे हे घरात एकटेच होते. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी जाणवल्याने त्यांनी नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. घराचा दरवाजा उघडताच बाथरूममध्ये मृतावस्थेत पडलेले पडोळे दिसले. त्यांच्या शरीराला मार लागल्याने घटनास्थळी रक्तस्रावही झालेला होता.
दारूच्या नशेत बाथरूममध्ये पडल्याने गंभीर दुखापत होऊन उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येते. तरीदेखील मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ROKHTHOK