● सीसीएफ डॉ. किशोर मानकर ऍक्शन मोडवर
● अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याची चर्चा.!
YAVATMAL NEWS :
दीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ वनविभागाला नव्या जोमाचा मुख्य वनसंरक्षक मिळाला आहे. तब्बल 9 महिन्यांनंतर डॉ. किशोर मानकर यांनी सीसीएफ म्हणून पदभार स्वीकारताच आपल्या कार्यपद्धतीची चुणूक दाखवून दिली. यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नुकतीच त्यांनी यवतमाळ, पुसद, पांढरकवडा आणि वाशिम येथील उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांसोबत आढावा बैठक घेत विविध सूचना दिल्यात. CCF Dr. Kishor Mankar on action mode.
या बैठकीत महसूल विभागाच्या ताब्यात गेलेल्या तब्बल 5 हजार हेक्टर वनजमिनीची चर्चा झाली. त्यावर तातडीने 2016 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करून ही वनजमीन महसूलच्या ताब्यातून परत घेण्यासाठी चारही डीएफओंना कारवाईबाबत आदेशीत केले. मुख्य वनसंरक्षकांनी यवतमाळ, पुसद आणि वाशिम विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. कार्यपद्धतीत आमूलाग्र बदलाची अपेक्षा व्यक्त करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याची चर्चा वन वर्तुळातून ऐकायला मिळाली.
यवतमाळ वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक पदावर डॉ. मानकर यांची नियुक्ती होताच त्यांनी यवतमाळ वनवृत्तातील पांढरकवडा, यवतमाळ, पुसद व वाशीम वन विभागातील राज्य योजना, जिल्हा योजना, डीपीसीपी, टीएसपी, ओटीएसपी आणि खनिकर्म अंतर्गत योजनांची माहिती जाणून घेत विस्तृत आढावा घेतला. प्रलंबित कामांवर फोकस करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात.
डॉ. मानकर यांची उल्लेखनीय कारकीर्द
महाराष्ट्र कॅडरचे 2006 बॅचचे IFS अधिकारी डॉ. किशोर मानकर यांना 2020 मध्ये नागपूर विभागात सीसीएफ म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी नंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे (PTR) मुख्य वनसंरक्षक आणि फील्ड डायरेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी वनआग नियंत्रणासाठी Landsat‑8 सॅटेलाइटच्या सहाय्याने फायर सेंसिटिव्हिटी मॅप तयार करून प्रभावी अंमलबजावणी केली.
वनकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ग्रामस्थांमध्ये जागरुकता, तसेच संशयास्पद हालचालींबाबत माहिती संकलन यासाठी त्यांनी PTR मध्ये प्रभावी उपाययोजना केल्या. ‘डक कॉंजरव्हेशन’ सारख्या प्रशिक्षण कार्यशाळाही त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी पार पडल्या.
डॉ. मानकर यांनी महाराष्ट्र झू अथॉरिटी, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले असून, नागपूर विभागात CCF (Territorial), CCF (Evaluation), CF (Planning & Management) अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. वनसंपत्तीच्या रक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे अधिकारी म्हणून डॉ. मानकर यांची ओळख असून, त्यांचे नेतृत्व वनविभागासाठी दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे.
ROKHTHOK






