● पत्नीचा मृत्यू तर मुलगी गंभीर
● आरोपी माजरी पोलिसांच्या ताब्यात
माजरी : भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुचना येथील वेकोलीच्या वसाहतीत मन सुन्न करणारी घटना गुरुवार दि. 13 जानेवारीला दुपारी घडली. वेकोलीत सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तीने पत्नी व मुलीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि पसार झाला. या घटनेत पत्नीचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

वीरेंद्र रामप्यारे साहनी (43) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत आहे. ते परिवारासह वेकोलि ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर-10 क्वार्टर नंबर-77 मध्ये वास्तव्यास होता.
गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान त्याने पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (36) हिच्या सोबत वाद घातला वादाचे पर्यवसान खुनी हल्ल्यात झाले. त्याने रागाच्या भरात चाकूने पोटात व छातीवर सपासप वार केले. याचवेळी मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (17) ही मध्ये आली असता त्याने तिच्या सुद्धा पोटात चाकू मारला. दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघताच त्याने पलायन केले.
आरोपी वीरेंद्र साहनी याने हे कृत्य करताच वसाहतीची भींत ओलांडून विसलोन गावाच्या दिशेने पळ काढला. मात्र परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले. घटने बाबत माजरी पोलिसांना सूचित करून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सिमरन ला उपचारार्थ चंद्रपूर ला हलविण्यात आले. तर मृतक पत्नी चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पत्नी व मुलीवर खुनी हल्ला का करण्यात आला या बाबतची माहिती पोलीस तपासात उघड होणार आहे. घडलेल्या या घटनेमुळे कुचना वसाहत परिसर प्रचंड हादरले आहे.
वणी: बातमीदार