● महिला व स्थानिकांना होतोय त्रास
● दारुभट्टीला काँग्रेसचा विरोध
हरीश कामारकर : पाच वर्षांपूर्वी महिला व स्थानिकांनी प्रखर विरोध केल्यामुळे प्रशासनाने देशी दारूचे दुकान बंद केले होते. तब्बल पाच वर्षानंतर तीच भट्टी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा धडाक्यात सुरू झाल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून तात्काळ देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे.

पाच वर्षांपूर्वी शहरातील वार्ड क्रमांक 17 मध्ये अस्तित्वात असलेल्या देशी दारु दुकानाला स्थानिक नागरिक व महिलांनी प्रचंड विरोध दर्शवला होता. महिलांच्या व नागरिकांचा रोष पाहता तत्कालीन प्रशासनाने हे दुकान बंद केले होते ते पुन्हा सुरु झाल्याने स्थानिकात संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरात पुन्हा त्याच प्रभागात दारुभट्टी सुरु करण्यात आली आहे. या दारू दुकानामुळे पुन्हा अनेक संसार उध्वस्त होणार आहे. स्थानिक महिला, विध्यार्थी, नागरिकांना दारुड्यांचा उपद्व्याप सहन करावा लागणार आहे. तसेच दारुभट्टी लगतच धार्मीक स्थळ आहेत, यामुळे हे देशी दारुचे दुकान बंद करणे गरजेचे असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर संभाजी नरवाडे, शैलेश सुरोशे, महेश पाटील, परवेज शफी सुरैय्या, जयश्री अशोक इंगोले, जयश्री संजय नरवाडे, रुपाली संतोष कोल्हेकर, सुनंदा दिलीप सुरोशे, सुरेखा विनोद सुरोशे या नगर पंचयतीतील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महागाव: बातमीदार