● मिनी मंत्रालयासाठी दुसरीफळी मैदानात
सुनील नाईक पाटील :
“मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुतांश राजकिय पक्ष दुसऱ्या फळीतील तडफदार उमेदवारांना रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. आरक्षण सोडतीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी मतदारसंघातील हे पाच चेहरे खऱ्या अर्थाने “स्टार” असणार आहे. त्यातच आमदारकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. Local Body Elections: BJP ready to avenge its defeat in MLA elections
दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी संभाव्य निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, राजकीय वारसा लाभलेल्या तरुण राजपुत्रांसह पक्षनिष्ठ पदाधिकारी आणि दुसऱ्या फळीतील दमदार नेतृत्व पुढे सरसावणार आहेत. मिनी मंत्रालयात अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने राजसत्ता अनुभवण्यासाठी आजी-माजी आमदार, विद्यमान खासदार आपल्या वारसदारांना जिल्हापरिषदेच्या रणसंग्रामात उतरवणार असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे नेते राजू उंबरकर यांचे चांगले प्रस्थ आहे. त्यांची “इलेक्टिव्ह पॉवर” Elective power ज्यांच्या पाठीशी असेल तो उमेदवार तुल्यबळ लढत देईल असे दिसते आहे. तसेच शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुळसंगे, काँग्रेसचे राजीव कासावार हे मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील “स्टार” चेहरे असतील असे दिसून येत आहे.
राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र सध्यस्थीतीत आहे. मतदारसंघात मनसेची भूमिका निर्णायक असेल. तर जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची ताकद किती हे स्पष्ट नाही. मात्र तीन तालुक्यात ते घवघवीत यश मिळवू शकतात हे नाकारता येणार नाही. त्यातच महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री संजय राठोड काय करिष्मा करणार यावर महायुतीचे गणित अवलंबून आहे. भाजप येनकेन प्रकारे सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्नरत असणार आहे.
महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस असली तरी “तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना” अशी अवस्था आहे. काँग्रेस पक्षाने किंबहुना त्यांच्या नेत्यांनी आपल्या वारसासाठी आग्रह धरला तर जिल्ह्यात वाटोळं होणार हे विसरू नये. होतकरू आणि तडफदार कार्यकर्त्यांना संधी व घटक पक्षाला इमानेइतबारे मदत केल्यास जिल्ह्यातील चित्र समाधानकारक असेल. तसेच वणी मतदारसंघात सुद्धा भाजपला तगडी फाईट देता येईल.
मिनी मंत्रालयावर कोणात्या पक्षाचा झेंडा फडकतो हे अजून स्पष्ट नाही, मात्र सर्वच पक्षांकडून सुरू झालेली जोरदार तयारी पाहता भारदस्त नेते या रणसंग्रामात उतरणार हे निश्चित आहे, मात्र आरक्षण सोडती नंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यातच वणी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे.
Rokhthok






