● मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल ● ऑटोचालकाच्या तत्परतेने वाचला जीव
PUSAD NEWS
पुसद बस आगार परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. महिला वाहकाने चक्क झाडावर चढून दोरीच्या साहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बघ्याची मोठी गर्दी जमली, दरम्यान ऑटोचालकाने दाखवलेल्या तत्परतेने महिलेचा जीव वाचला. Shocking….. Female carrier climbed a tree, attempted suicide
घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास पुसद बस आगारातील महिला कंडक्टरने झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी या महिला वाहक व एका विद्यार्थिनीमध्ये तिकीटाच्या वादातून शाब्दिक चकमक झाली होती. या बाबतचा शेवट प्रवासी निवाऱ्यामध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या कथित मारहाणीमध्ये झाला.
घडलेल्या घटनेची तक्रार विद्यार्थिनीने पुसद शहर पोलीस स्टेशन व आगार व्यवस्थापकांकडे लेखी स्वरूपात दिली होती. तक्रारीनंतर महिला वाहकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेच्या मानसिक त्रासातून पीडित महिला वाहकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे बोलल्या जात आहे.
घटनेच्या वेळी पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे व पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित असलेल्या एका ऑटोचालकाच्या धाडसामुळे महिलेचा जीव वाचला. त्याने तत्परतेने महिलेला झाडावरून खाली उतरवले.
महिलेचे घटनास्थळी समुपदेशन करून तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पुसद येथे दाखल करण्यात आले आहे. घडलेल्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Rokhthok






