● शहरातील दुसरी धडाकेबाज कारवाई
● अवैध व्यावसायिक दहशतीत, पुढील सावज कोण ?
Crime News :
वणी शहरातील कुख्यात सराईत गुन्हेगार अमोल उर्फ भुऱ्या विजय ठाकरे (31) हा चिखलगाव येथील रामनगर परिसरात वास्तव्यास आहे. याला अखेर पोलिसांनी दणका देत महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्ट (M.P.D.A.) अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार त्याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. शहरातील ही दुसरी धडाकेबाज कारवाई असून यापूर्वी जमीर उर्फ जम्मू खान याला गजाआड करण्यात आले होते. Earlier, Jameer alias Jammu Khan was arrested.
मागील काही वर्षापासून वणी शहरात वारंवार चोरी करून नागरिकांना हैराण करणारा भुऱ्या ठाकरे हा प्रत्येक वेळी पोलिसांच्या तावडीत सापडला मात्र जामिनावर सुटून परत चोरीच्या मालिकेत गुंतत होता. त्याला मागील वर्षी उपविभागीय अधिकारी वणी यांनी तडीपारही केले होते. मात्र तडीपारी संपल्यानंतर तो पुन्हा शहरात परतताच चोरी, अवैध शस्त्र बाळगणे व नागरिकांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला होता.
सततच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार दिनांक 4 सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी भुऱ्या ठाकरेला M.P.D.A. अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत नागपूर कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील पो.उपनिरीक्षक धीरज गूल्हाने, पो.कॉ. मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूप्पलवार, गजानन कुडमेथे आदींनी केली.
वणी पोलिसांच्या या दणदणीत कारवाईने शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून अवैध व्यवसाय व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या त्यांच्या धडाकेबाज पवित्र्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र यापुढील “सावज”कोण असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार असले तरी “ठाणेदारांनी कसली कंबर, नाव आहे गोपाल उंबरकर” अशी धास्ती अवैध व्यावसायिकांनी घेतली आहे.
ROKHTHOK






