Home वणी परिसर आघाडी सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहावे.. देवेंद्र फडणवीस

आघाडी सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहावे.. देवेंद्र फडणवीस

935

वणी :- या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमूळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आम्ही करीत आहो मात्र आघाडी सरकारला शेतकऱ्यांशी काही देने घेणे नाही. बळीराजाला आज आधार देण्याची गरज असल्याने आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी वणी येथे उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात केले.

Img 20250422 wa0027

वणी नगर परिषदेने जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. 1 कोटी 70 लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मनमोहक उद्यान तयार करण्यात आले. दि 1 ऑक्टोबर ला या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, आ. अशोक उईके, संदीप धुर्वे, रणजीत पाटील, संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अण्णासाहेब पारवेकर, नितीन भुतडा, विजय पिदूरकर, दिनकर पावडे,संजय पिंपलशेंडे रवी बेलूरकर, विजय चोरडिया उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

देवेंद्र फडणवीस हे नागपूर वरून वणी करीता निघाले असता प्रथम ते कार्यक्रम स्थळी न जाता शेतीच्या बांधावर गेले होते. तालुक्यातील निळापूर येथील महिला शेतकरी रुंदा अरुण झट्टे यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली. झालेल्या अतिवृष्टी मुळे या महिला शेतकऱ्याच्या शेताततील कापूस व सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्याला धीर दिला. कोणतीही पीक पाहणी न करता सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असून भाजप हा सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. या आघाडी सरकारला मदत देण्यास आम्ही भाग पाडणार असल्याचे ते बोलले.

पुढे बोलतांना फडणवीस यांनी आघाडी  सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सरकार मधील मंत्री टीव्ही वर मोठं मोठया घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात कधी पूर्ण केल्या नाही. आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे, कपाशीचे बोण्ड काळी पडली आहे, सोयाबीनच्या शेंगांना दानाच नाही. त्यामुळे आज राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजप सत्तेत असतांना वणीच्या विकासासाठी भरीव निधी दिला होता. मात्र गेल्या दोन वर्षात या सरकारने एक दमडीही दिली नाही. शहराच्या झालेल्या विकास कामा बद्दल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व नगरसेवकांचे कौतुक केले.

विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार बोलतांना म्हणाले की, वणीकर नागरिकांच्या आशीर्वादाने 25 पैकी 22 नगरसेवक भाजपाचे निवडून देऊन आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला तो आम्ही पूर्ण केला. मागील 25 वर्षात जेवढा निधी या नगर परिषदेला मिळाला नाही त्यापेक्षा अधिक निधी देवेंद्र फडणवीस व हंसराज अहिर यांच्यामुळे आणण्यात आम्ही यशस्वी झालो. वणी शहराच्या विकासासोबत ग्रामीण भागाचा सुद्धा सर्वांगीण विकास झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले. यात त्यांनी वणी शहराच्या विकासाचा आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याच्या स्थायी योजनेसाठी 67 कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजीना विनंती केली.

भाषणा दरम्यान वेगळ्या विदर्भच्या घोषणा 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाषण देण्यासाठी उभे झाले असता आधीच प्रेक्षकां मध्ये बसलेले विदर्भ राज्य आंदोलनाचे कार्यकर्ते रफिक रंगरेज, रुद्रा कुचनकार, देवराव धांडे, विजया आगबत्तलवार, दशरथ बोबडे, राहुल खारकर यांनी वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ वातावरण तापले होते मात्र फडणवीस यांनी आमचा ही या मागणीला पाठींबा असल्याचे बोलल्याने कार्यकर्ते शांत झाले.