वणी:- आपल्या मातापित्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर केवळ इच्छाशक्ती घेऊन महाविद्यालयात या, त्या इच्छाशक्तीला पंख देण्याची आणि त्याआधारे यशाच्या अपार आकाशात उड्डाण करण्यासाठी आधार निर्माण करून देईल ही ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपणास प्रदान करतो ” असे विचार लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या वतीने 2021-22 वर्षांत प्रथम वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमात उद्घाटक स्वरूपात ते विचार व्यक्त करीत होते. ते पुढे म्हणाले की, तुम्हाला तुमची सर्वांगीण प्रगती करायची आहे का? या प्रश्नाचे तुमचे उत्तर हो असेल तर ती कशी करायची? याचे विविधांगी समाधान आपले महाविद्यालय तुम्हाला उपलब्ध करून देईल. आपल्या मनातील प्रश्न, आपल्या अपेक्षा, परीक्षेतील यशाची अभिलाषा, विविध कौशल्य प्राप्तीची इच्छा या गोष्टींसह आपण महाविद्यालयात येता.
आपण सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी असायला हवे, आपल्याला अंतर्गत आणि विद्यापीठीय परीक्षेत सुयोग्य साह्य मिळायला हवे अशी आपली अपेक्षा रास्त आहे. मात्र या जगात फुकट काहीही मिळत नाही. या इच्छेला तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. सोपा पेपर येण्याची अपेक्षा न करता आलेला पेपर सोपा वाटेल असा आपला अभ्यास असायला हवा. आम्हाला सुयोग्य रोजगाराची संधी मिळायला हवी असेल तर आम्ही रोजगाराला योग्य ठरलो पाहिजे.
सर्वोच्च यश आणि सुविधा या गोष्टी एका वेळी उपलब्ध होत नसतात. आपल्याला सोयीचे नाहीतर हिताचे निवडता यायला हवे. आत्ता करण्यासारख्या नसल्या तरी जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी आत्ता पासून प्राप्त केल्या नाही तर आवश्यकता निर्माण होते त्यावेळी त्या अचानक उद्भवत नसतात. अशा विविध मुद्द्यांच्या आधारे महाविद्यालयाच्या पदवी स्तरावरील या तीन वर्षात आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व आपल्याला आणि आपल्या संबंधातील प्रत्येकाला आनंददायी निर्माण करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे सांगत प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
दीक्षारंभ 21 या उपक्रमाचे संयोजक डॉ. करमसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक करताना या उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट करून महाविद्यालयातील पारंगत प्राध्यापक वर्गाचा परिचय करून दिला.सहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमातील पहिल्या दिवशी चे आभार प्रदर्शन डॉ. अजय राजूरकर यांनी केले. आभासी पद्धतीने चालणाऱ्या या उपक्रमाचे तांत्रिक सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे आणि डॉ.मनोज जंत्रे यांनी केले.