किसानसभा आक्रमक, आरोपीवर कारवाईची मागणी

बातमीदार: झरी जामनी तालुक्यातील तेजापूर या गावात वास्तव्यास असलेल्या व अडेगाव हद्दीतील अतिक्रमित जमिनीवर वाहिती करणाऱ्या 32 शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची नासधूस 26 जुलै ला करण्यात आली. आमलोन या गावातील त्या गावगुंडांना राजकीय व पोलिसांचे “पाठबळ” असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसानसभेने केला असून आरोपीवर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे.
तेजापूर येथील 32 शेतकरी मागील 30 वर्षापासून अडेगाव हद्दीतील खंड क्र. 2 वर अतिक्रमण करून शेतीची वाहिती करीत आहे. याच माध्यमातून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तेजापूर येथील शेतकऱ्यांनी पट्टा मिळण्याकरिता त्याचा दावा अर्ज संबंधित विभागास पाठविला आहे. त्यावर अजूनही कोणतीही कारवाही झाली नाही. या प्रश्नावर किसानसभा सतत आंदोलन तसेच पाठपुरावा करताहेत. याप्रकरणी अद्याप शासन दरबारी कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. तसेच शेतकऱ्यांना पट्टा देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे.
आमलोन येथील गावगुंडांनी बळजबरीने शेतात घुसून शेतातील पिकांची केलेली नासधूस निषेधार्ह असून त्यांचेवर कठोर कार्यवाही व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल तसेच पोलीस स्टेशन ला घेराव घालण्यात येईल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी किसान सभेचे शंकर दानव, ऍड. दिलीप परचाके, मनोज काळे यांच्यासह रक्तदान महादान फाऊंडेशनचे मंगेश पाचभाई उपस्थित होते.