Home Breaking News थरार…..जादूटोण्याचा संशय, दाम्पत्याला जबर मारहाण

थरार…..जादूटोण्याचा संशय, दाम्पत्याला जबर मारहाण

2181

अज्ञातांनी घर व दुचाकी जाळली
पोफाळी पोलिसात गुन्हा दाखल

उमरखेड: तालुक्यातील तरोडा येथे वास्तव्यास असलेल्या दाम्पत्याला जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून अज्ञातांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर घर व दुचाकीला आग लावल्याची घटना उघडकीस आली असून पोफळी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येते. परंतु ग्रामीण भागातील नागरिक अद्याप पूर्वाश्रमीच्या जोखडातून बाहेर पडल्याचे दिसत नाही.

पोफळी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या तरोडा या गावात वास्तव्यास असलेल्या दाम्पत्याला जादुटोणा करत असल्याचे संशयावरुन जबर मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपीनी त्यांच्या घराला व दुचाकीला आगीच्या हवाली केले. आगीने रौद्ररूप धारण करत घर व दुचाकी भस्मसात केली.

अकस्मात घडलेल्या या प्रकाराने दाम्पत्य प्रचंड भयभीत झाले. जखमी अवस्थेत त्यांनी रविवार दि. 20 फेब्रुवारी ला ग्रामस्थाना मदतीची याचना केली. पोलिसांना सूचित करण्यात आले. जखमी अवस्थेतील विनायक ग्यानबा भोरे यांना उपचारार्थ हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्या पत्नीने पोफळी पोलीस ठाणे गाठून ठाणेदार राजीव हाके यांना आपबिती कथन करत रीतसर तक्रार दाखल केली.

ठाणेदारांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीजन्य पुरावा व मोका पाहणी करून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि कलम 143, 147, 149, 307, 436, 452 नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेचा पो.उप.नि राजेश पंडीत, राम गडदे, किसन राठोड तपास करीत आहेत.
उमरखेड: बातमीदार