*प्रथमदर्शनी अहवालात मनमर्जीतील आकडे

*ज्याच्या घरी चोरी झाली तोच संभ्रमात
सुनील पाटील: वणी तालुक्यातील मानकी येथे अज्ञात चोरट्यानी बुधवार व गुरुवारच्या मध्यरात्री संजय शालीक पुंड (37) यांचे घरी चोरी केली. घरातून तब्बल 4 तोळे साडेसहा ग्राम सोन्याचे आभूषण व 15 ग्राम चांदीच्या तोरड्या तसेच 13 हजार 500 रुपये रोकड चोरी गेल्याची तक्रार वणी पोलिसात नोंदवली. मात्र प्रथमदर्शनी अहवालात सोन्याचे दर प्रचंड गडगडल्याचे दिसून येत असून साडेचार तोळे सोनं अवघ्या 35 हजाराचे दर्शविण्यात आल्याने ज्याच्या घरी चोरी झाली तो संभ्रमात आहे.
संजय शालीक पुंड (37) यांची प्रकृती बरी नसल्याने ते घटनेच्या दिवशी वणी शहरात उपचारासाठी गेले होते. रात्री ते नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले. त्यांच्या पश्चात मानकी येथील घरी पत्नी सविता, तीन मुली व वडील घरीच होते. रात्री ते झोपलेले असताना अज्ञात चोरट्यानी घरातील कपाटातून सोने, चांदी व रोकड लंपास केली. याप्रकरणी वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे व अज्ञात चोरट्या विरुद्ध FIR नोंद करण्यात आला आहे.
पुंड यांनी नोंदविलेल्या तक्रारीत 35 ग्राम सोन्याची पोत, 2 ग्राम लहान मुलांचा गोफ, 2 ग्राम लहान मुलांची अंगठी, 5 ग्राम सोन्याची अंगठी, 2 ग्राम सोन्याचे डूल, अर्धा ग्राम जिवती असे एकूण 46.5 ग्राम सोने व 15 ग्राम चांदीच्या तोरड्या तसेच 13 हजार 500 रुपये रोकड चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी मात्र FIR मध्ये प्रती ग्राम सोन्याचा अति अल्प दरांची नोंद करण्याचा नेमका उद्देश काय हे नउलगडणारे कोडे आहे. यामुळे सोन्याचे दर गडगडले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी FIR नोंदवतांना 35 ग्राम सोन्याचा दर 27 हजार लावला आहे तर 2 ग्राम सोने हजार ते दीड हजार रुपये ठरवले आहे. चक्क पाच ग्राम सोन्याची अंगठी अवघ्या 3 हजारात दर्शवली आहे आणि 46.5 ग्राम सोने केवळ 35 हजार रुपयांचे नोंदवल्याने ज्याच्या घरी चोरी झाली तो सुद्धा संभ्रमित झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना सत्यतेवर आधारित आकलन करणे अभिप्रेत आहे. अकल्पनिय आकडे नोंदवून काय सिद्ध करणार हे न उलगडणारे कोडे आहे. त्याच सोबत तंतोतंत 50 हजाराची चोरी झाल्याचे नोंदविण्यात आल्यामुळे दरोड्याचे रूपांतर चोरीत तर करण्यात आले नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.