● आघाडी सरकार विरोधात रोष
आघाडी सरकार मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी आघाडी सरकार विरोधात रोष व्यक्त करत मंगळवार दि.30 नोव्हेंबर ला भाजपने धरणे आंदोलन केले.
विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध मागण्याचे निवेदन उप विभागीय अधिकारी यांना दिले. शासनाची चाललेली दडपशाही अन्यायकारक आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्याना लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी भाजपा सरसावली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाची बोन्ड सडली, कापूस पडला, सोयाबीन चिखलात एकरूप झाली. अशा प्रकारे अतोनात नुकसान झाले. वणी तालुक्यातील 9 मंडळांपैकी शिंदोला, पुनवट या मंडळात अतिवृष्टी होऊनही या मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांची अशी दयनीय स्थिती असतांनाच शासनाच्या विद्युत विभागाने थकीत कृषी पंप वीज धारक शेतकऱ्यांची विद्युत जोडणी खंडित करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक घेण्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
धरणे आंदोलनात दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, तारेंद्र बोर्डे गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, विजय गारघाटे, शंकर बांदुरकर, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, आशिष डंभारे, जयमाला दर्वे, लिशा विधाते, मंजू डंभारे, शुभम गोरे यांचेसह शेकडों कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार