● चालक- वाहक गजाआड, आजपर्यंतच्या कारवाईत खरे सूत्रधार गळाला लागल्याचे ऐकिवात नाही.!
Crime News :
जिल्ह्यात बळावत चाललेल्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन एकदाचे सज्ज झाल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून याच विषयावर “रोखठोक” बातम्या प्रसारित होत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी आणि धडक कारवाई केली. आंतरराज्यीय गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला. तब्बल 65 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक- वाहक यांना ताब्यात घेण्यात आले, खरे सूत्रधार गळाला लागणार का हे मात्र संशोधनाचा विषय आहे. LCB raid: Interstate gutkha smuggling busted
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा तस्करीविरोधात मोहीम उघडली. 27 डिसेंबरला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून पांढरकवडा मार्गे एका आयशर वाहनातून प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. ढोकी गावाजवळ सापळा रचून UP-94-AT-2305 क्रमांकाच्या आयशर वाहनाला अडविण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनात सागर पानमसाला व सुगंधित तंबाखू (SR-1) ची तब्बल 180 पोती आढळून आली. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला हा साठा तेलंगणातून जिल्ह्यात आणला जात असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी वाहनचालक मोहन सियाराम यादव(26) रा. पिचोड, जि. शिवपुरी, म.प्र. आणि क्लिनर बुध्दा बाबुसिंग परीयार (35) जि. शिवपुरी, म.प्र. यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हे दोघे केवळ चालक- वाहक असल्याची चर्चा असून, प्रत्यक्षात ही तस्करी कुणाच्या आदेशाने, कुणासाठी आणि कुठे पोहोचवली जात होती, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
संघटित स्वरूपात चालणारी गुटखा तस्करी, मोठ्या प्रमाणावरील साठवणूक, परराज्यातून येणारा प्रतिबंधित तंबाखू आणि अल्पवयीन व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, या गुन्ह्यांकडे ‘सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर अपराध’ म्हणून संबंधित अन्न व औषध प्रशासन विभाग लक्ष देत नाही.
“प्रतिबंधित तंबाखूची विक्री हा केवळ नियमभंग नसून तो मानवी जीविताला धोका पोहोचवणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये BNS कलम 328 व FSS Act कलम 59 अंतर्गत non-bailable गुन्हे नोंदविणे कायदेशीरदृष्ट्या योग्य व आवश्यक आहे, मात्र तसे होतांना दिसत नाही.
प्रतिबंधित तंबाखूचे तस्कर “सैराट” झाले आहे. त्यातच पोलिसी कारवाईनंतर हातावर पोट घेऊन जगणारे जेरबंद होतात, मोठे मासे मात्र वातानुकूलित कार्यालयातून सूत्र चालवत असल्याचे आजपर्यंतच्या कारवाईत सिद्ध झाले आहे. तपासाअंती पोलिसांनी मुख्य सुत्रधाराला अटक केल्याची प्रेस नोट कधीच बघायला मिळाली नाही.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे PI सतीश चवरे यांच्या नेतृत्वात API दत्ता पेंडकर, PSI. धनराज हाके, गजानन राजामलु, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सलमान शेख, नरेश राऊत यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आला आहे.
ROKHTHOK






